‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने कोल्हापूर येथे आयुर्वेद महोत्सवास प्रारंभ !
आज वैद्य सुविनय दामले यांचे व्याख्यान !या महोत्सवात शनिवार, २८ ऑक्टोबर या दिवशी सुप्रसिद्ध वैद्य सुविनय दामले यांचे सायंकाळी ५ ते ७.३० या वेळेत ‘निरोगी जीवनाकडे जाण्याचा मार्ग आणि आपत्कालीन आजारावर घेण्याची घरगुती औषधे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तरी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. |
कोल्हापूर, २७ ऑक्टोबर (वार्ता.) – आयुर्वेदाचा प्रसार, प्रचारासाठी वर्ष २०१३ मध्ये आमच्या संघटनेची स्थापना झाली. आयुर्वेद ही आपली प्राचीन परंपरा असून कोरोना महामारीच्या काळात अश्वगंधा आणि गुळवेल या भारतीय औषधी वनस्पतींचे महत्त्व जागतिक स्तरावर लक्षात आले. भारतीय संस्कृती, अध्यात्म, आयुर्वेद हेच प्रत्येक समस्येवर शाश्वत उत्तर आहे. आमच्या संघटनेच्या वतीने गावोगावच्या शेतकर्यांनाही आयुर्वेदिक वनस्पती लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येते. सध्याचे सरकारही ‘आयुष’ मंत्रालयाच्या माध्यमातून आयुर्वेदाचा चांगला प्रचार करत आहे, असे प्रतिपादन ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’चे अध्यक्ष श्री. शेखर खोले यांनी केले. हा महोत्सव २९ ऑक्टोबर अखेर चालणार आहे.
ते कमला महाविद्यालयाजवळील ‘व्ही.टी. पाटील हॉल’ येथे ‘आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशन’च्या वतीने आयोजित ‘आयुर्वेद महोत्सवा’च्या उद़्घाटन सत्रात बोलत होते. छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते महोत्सवाचे उद़्घाटन झाले. या प्रसंगी महोत्सवाचे आयोजक श्री. प्रदीप भिडे, श्री. संजय आपटे, श्री. शशिकांत कुलकर्णी, डॉ. अभिजित डुबल, ‘बी’ न्यूज वृत्तवाहिनीचे संपादक श्री. चारुदत्त जोशी, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, वैद्य वामनाचार्य-गोकाककर, सचिव – अनिल कातोरे, कोषाध्यक्ष – चंद्रकांत भुसारी, सुधाकर बोरुडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवात विविध आयुर्वेदिक औषधी आस्थापनांनी त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन कक्ष उभारले आहेत.
या महोत्सवात औषधी वनस्पतींचे प्रदर्शन आणि लागवडीसाठी मार्गदर्शन करण्यात येत असून विनामूल्य आरोग्य पडताळणी करण्यात येत आहे.
क्षणचित्रे
१. उपस्थित मान्यवरांना आयुर्वेदिक वनस्पतीचे रोप भेट देण्यात आले.
२. श्री. गौतम जैन यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांना ‘रिफ्रेश युवर माईंड’ हे पुस्तक भेट देण्यात आले.