छत्रपती संभाजीनगर – शहरातील मुकुंदवाडी गट क्रमांक ४५ मधील जिजाऊनगर परिसरात मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या पत्र्याच्या शेडची दुकाने हटवण्यासाठी २७ ऑक्टोबर या दिवशी महापालिकेचे पथक गेले होते. या वेळी जमावाकडून पथकावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत जमावाने साहाय्यक आयुक्तांसह इमारत निरीक्षकाला मारहाण केली, तसेच महापालिका अतिक्रमण हटाव पथकाचा जेसीबीही पेटवून दिला.
जिजाऊनगर भागात ३ सहस्र चौरस फुटांच्या प्लॉटवरून न्यायालयात वाद चालू आहे. ‘तेथे बांधकाम करू नये’, असे न्यायालयाचे आदेश आहेत. यासंबंधी महापालिकेकडे प्रविष्ट तक्रारीवरून साहाय्यक आयुक्त श्रीधर टारपे यांचे पथक कारवाईसाठी गेले असता हा प्रकार घडला. याविषयी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी म्हणाले, ‘‘या घटनेत २५ ते ३० लाख रुपयांची हानी झाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद केला जात आहे. महापालिकेचे पथक याच ठिकाणी का गेले ? या संदर्भात तक्रार आल्यास चौकशी केली जाईल.’’
संपादकीय भूमिका‘चोर तो चोर वर शिरजोर’ अशी वृत्ती नष्ट होण्यासाठी गुन्हेगारांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |