मुंबई येथे मराठा कार्यकर्त्‍यांकडून अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या गाड्यांची तोडफोड !

गुणरत्न सदावर्ते

मुंबई – येथील क्रिस्‍टल टॉवर परिसरात मराठा क्रांती मोर्चाच्‍या कार्यकर्त्‍यांकडून अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या घराबाहेर उभ्‍या असलेल्‍या गाड्यांची तोडफोड करण्‍यात आली आहे. ही घटना २६ ऑक्‍टोबर या दिवशी सकाळी घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्‍ह्यातील फुलंब्री गावातील हे कार्यकर्ते आहेत. मराठा आरक्षणाला सदावर्ते यांनी विरोध केला; म्‍हणून त्‍यांनी हे कृत्‍य केले आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गाड्यांची तोडफोड करणार्‍या ३ तरुणांना कह्यात घेतले. या आंदोलकांनी गाड्या फोडत असतांना ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा दिल्‍या.

‘आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्‍या शांततामय आंदोलनाची हीच व्‍याख्‍या का ?’ असा प्रश्‍न अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांनी उपस्‍थित केला आहे. ‘मराठा आरक्षणाला विरोध केल्‍यामुळे अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍यावर आक्रमण होऊ शकते’, अशी माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. त्‍यानंतर अधिवक्‍ता सदावर्ते यांच्‍या सुरक्षेसाठी १० ते १२ पोलीस ठेवण्‍यात आले होते. तरीही ‘आंदोलकांनी माझ्‍या घरात घुसण्‍याचा प्रयत्न केला आहे’, असा आरोप अधिवक्‍ता सदावर्ते यांनी केला.


अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांच्‍या गाड्यांच्‍या तोडफोडीचे समर्थन नाही ! – मनोज जरांगे पाटील

जालना – अधिवक्‍ता गुणरत्न सदावर्ते यांची गाडी कुणी फोडली असेल, तर त्‍याचे समर्थन होणार नाही. तोडफोड करणारे मराठा समाजाचे नसतील, असे मत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी व्‍यक्‍त केले आहे. ते म्‍हणाले की, सरकारने आरक्षणाचा विषय संपवावा. वास्‍तविक अधिवक्‍ता सदावर्ते यांच्‍या गाड्यांच्‍या तोडफोड प्रकरणी मला काहीच माहिती नाही. आम्‍ही शांततेत आंदोलन करत आहोत. सहस्रो गावांत शांततेत आंदोलन चालू आहे.