काही शतकांपूर्वी हिंदूंमधील लढाऊ वृत्ती न्यून होऊ लागली. येणार्या पिढ्यांमधील कणखरपणा जागृत व्हावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी राज्याचे स्मरण बालवयापासूनच व्हावे, यासाठी दिवाळीच्या वेळी लहान मुलांना किल्ले बांधण्यास शिकवण्याची प्रथा चालू झाली. लहान मुलांनी बनवलेल्या या किल्ल्यावरील सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज, त्यांचे अष्टप्रधान मंडळ आणि मावळे यांना विराजमान करून हिंदवी स्वराज्याची कल्पना रुजवण्याचे कार्य चालू झाले.
– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती ॐ
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील गड-दुर्गांचे एक अनोखे वैशिष्ट्य !
सह्याद्रीच्या घाट माथ्यावर आणि पश्चिमेकडे बहुतेक गड-दुर्ग येतात. भूशास्त्रीय वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व दुर्ग ‘बेसॉल्ट’ थरावर बसवले आहे. त्यामुळे त्याचे विदरण असे होते की, त्याचे ‘ब्लॉक’ आणि ‘कॉलम’ वेगळे होऊन नैसर्गिक भिंत तयार होते. हे वैशिष्ट्य भारतात कुठेही आढळत नाही. अशा कड्यावर महाराजांनी तट आणि बुरुज बांधून भक्कम केले. त्यामुळे हे गड-दुर्ग दुर्गम आणि अजिंक्य होते. हे गड-दुर्ग म्हणजे नाशिकपासून बेळगांवपर्यंत असलेली मराठ्यांची प्रतिकारांची ढाल ! उदा. विशाळगड, पन्हाळा, प्रतापगड, प्रचीतगड, वासोटा, हरिश्चंद्रगड, जीवधन, लोहगड, तुंग.
– (साभार : ‘द ग्रेट मराठा वॉरियर्स’ या फेसबुक खात्यावरून)