राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर शहरात दसरा संचलन उत्साहात ! 

कोल्हापूर शहर येथील संचलनात सहभागी स्वयंसेवक

कोल्हापूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर शहरात दसरा संचलन उत्साहात पार पडले. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. दुधाळी मैदानावर स्वयंसेवक एकत्र आले. भगव्या ध्वजाला वंदन करून आणि संघ प्रार्थना म्हणून संचलनाला प्रारंभ झाला. अश्वारूढ ध्वज, स्वयंसेवकांच्या रांगा अशा शिस्तबद्ध पद्धतीने संचलन निघाले. शहरातील मार्गांवर जाऊन हे संचलन परत दुधाळी मैदान येथे आले.

संचलन मार्गावर जागोजागी नागरिकांनी रांगोळ्या काढून आणि स्वयंसेवकांवर पुष्पवृष्टी करून स्वागत केले. शहरातील ५०० हून अधिक स्वयंसेवक संचलनात सहभागी झाले होते. भारतीय वाद्यांचे घोषपथक आणि त्यांनी वाजवलेल्या विविध रचना हे या संचलनाचे आकर्षण ठरले. संचलनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक श्री. अप्पासाहेब दड्डीकर, शहर संघचालक श्री. प्रमोद ढोले यांसह संघाचे इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापूर शहर येथील संचलनात सहभागी स्वयंसेवक

निपाणी तालुक्यात संघाचे पथसंचलन ! 

निपाणी (कर्नाटक) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने खडकलाट उपखंडातील अकोळ येथे विजयादशमी पथसंचलन आणि उत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला उपखंडातील खडकलाट, ममदापूर, सिदनाळ, लखनापूर, पडलीहाळ, पट्टणकुडी, बेडकिहाळ, गळतगा, हुन्नरगी आणि इतर गावांतील स्वयंसेवक, नागरिक उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून अक्कोळ येथील प्रगतीशील शेतकरी श्री. विनायक किल्लेदार आणि प्रमुख वक्ते म्हणून श्री. रमेश कोटीभास्कर उपस्थित होते.

अकोळ येथे विजयादशमी पथसंचलनात सहभागी स्वयंसेवक