नरकासुरदहन प्रथा बंद करा !

गोव्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे आवाहन

वास्को, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – राज्यात दीपावलीच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात राबवली जाणारी नरकासुरदहन प्रथा बंद करण्याचे आवाहन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले आहे. वास्को येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी हे आवाहन केले.

ते पुढे म्हणाले, ‘‘नरकासुरदहन प्रथा पूर्वी लहान प्रमाणात होती. पूर्वी लहान मुलेच घरच्या घरी नरकासुराची प्रतिमा करून दीपावलीच्या पहाटे त्याचे दहन करत होती; मात्र आता या प्रथेला मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. गोवा वगळता देशात अन्य कुठेही अशी प्रथा नाही. वर्ष १९८४ नंतर काँग्रेसच्या राजवटीत नरकासुरदहन प्रथेला मोठे स्वरूप प्राप्त झाले. आज नरकासुराच्या मोठमोठ्या प्रतिमा बनवल्या जातात. या प्रथेच्या अनुषंगाने मुले वाईट कृत्ये करतात, तर काही वेळा या प्रथेमुळे मुलांना प्राणही गमवावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणात राबवली जाणारी नरकासुरदहन प्रथा पूर्णपणे बंद झाली पाहिजे. राजकारण्यांनी नरकासुराच्या प्रतिमा बनवण्यासाठी देणग्या देणे बंद केले पाहिजे. मी पूर्णपणे नरकासुरदहन प्रथेच्या विरोधात आहे. या प्रथेमुळे कोणताच लाभ होत नाही. नवीन पिढीला आपल्या संस्कृतीविषयी चांगले ज्ञान दिले पाहिजे.’’