मोपा विमानतळावर २८ ‘आयफोन’ आणि ५.७ किलो सोने कह्यात

तस्करीच्या प्रकरणी मोठी कारवाई

पणजी, २२ ऑक्टोबर (वार्ता.) – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डी.आर्.आय.च्या) गोवा विभागाने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तस्करीच्या प्रकरणी प्रथमच मोठी कारवाई केली आहे. या विभागाने अबु धाबी येथून आलेल्या प्रवाशांकडून २८ ‘आयफोन १५ प्रोमॅक्स’चे संच आणि ‘पेस्ट’च्या स्वरूपात असलेले ५.७ किलो सोने मिळून एकूण ३ कोटी ९२ लाख रुपये किमतीचा ऐवज कह्यात घेतला आहे.

या प्रकरणी कमरन अहमद गयासुद्दीन खान (वय ३८ वर्षे, रहाणारा मुंबई), इरफान (वय ३० वर्षे, रहाणारा उत्तरप्रदेश) आणि महंमद इर्फान गुलाम नबी उपाख्य बाला पटेल (वय ३७ वर्षे, रहाणारा गुजरात) यांना कह्यात घेतले आहे. ‘डी.आर्.आय.’च्या मते तिघेही संशयित हे दुबई आणि मुंबई यांमध्ये चालू असलेल्या सोन्याच्या तस्करीच्या टोळीमधील सदस्य आहेत. तिघेही संशयित १२ ऑक्टोबर या दिवशी अबु धाबी येथे गेले होते आणि ते तस्करी केलेले सोने घेऊन २१ ऑक्टोबरच्या रात्री परतले. ‘आयफोन’चे संच तपासणी केली जात असलेल्या सामानात गुंडाळून ठेवण्यात आले होते, तर सोन्याच्या ‘पेस्ट’चा काही भाग एका संशयिताच्या कमरेच्या पट्ट्यांमध्ये सीलबंद करण्यात आला होता, तर ‘पेस्ट’चा उर्वरित भाग गुंडाळून तो अन्य २ प्रवाशांच्या कपड्यांमध्ये आतल्या भागात सीलबंद करण्यात आला होता.