सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांना भक्तीसत्संग ऐकत असतांना आलेल्या अनुभूती आणि त्यांनी रेखाटलेली नवदुर्गादेवीची चित्रे येथे देत आहोत.
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची भक्तीसत्संगातील दैवी वाणी ऐकल्यावर स्वतःभोवतालचे त्रासदायक आवरण नष्ट होऊन भाव जागृत होणे
‘वर्ष २०२१ मधील नवरात्रीच्या कालावधीत मी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा प्रतिदिन दुपारी होणारा मराठी भाषेतील भक्तीसत्संग ऐकत असे. त्या सत्संगात बोलत असतांना मी त्यांच्या शब्दांऐवजी त्यांची वाणी ऐकायचे. केवळ त्यांची वाणी ऐकल्यानेच माझा भाव जागृत होत असे. त्या वाणीने माझ्याभोवती असलेले त्रासदायक आवरण संपूर्णपणे नष्ट करून माझा भाव जागृत केला, तसेच मला एका वेगळ्याच विश्वात नेऊन आनंदात न्हाऊ घातले.
२. भक्तीसत्संगामुळे झालेला अध्यात्मप्रसार
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा भक्तीसत्संग ऐकत असतांना मी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले ‘नवरात्री’च्या संदर्भातील लेख वाचून त्यांचे तमिळ भाषेत भाषांतर करण्याची सेवा करत होते, तसेच त्यांची दैवी वाणी ऐकत मी श्री नवदुर्गादेवीची चित्रे काढली. आम्ही नवरात्रीच्या संदर्भातील ते लेख चित्रांसहित सनातनच्या तमिळ भाषेतील संकेतस्थळावर ठेवू (अपलोड करू) शकलो.
आ. चेन्नई येथील साधकांना पतंजलि योग समिती, कालारिग्राम आणि ‘श्री’ वाहिनी यांच्यासाठी नवरात्रीनिमित्त विशेष ‘ऑनलाईन’ सत्संग घेण्याची संधी मिळाली.
३. चेन्नई येथील श्री मूकांबिकादेवीच्या मंदिरात झालेल्या ‘राजमातंगी’ यज्ञाच्या वेळी आलेल्या अनुभूती !
अ. सरस्वतीदेवीच्या पूजेच्या आदल्या दिवशी चेन्नई येथील श्री मूकांबिकादेवीच्या मंदिरात ‘राजमातंगी’ यज्ञ झाला. मला त्या यज्ञात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्या वेळी ‘मी रामनाथी आश्रमात आहे आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या उपस्थितीत यज्ञ होत आहे’, असे मला जाणवले.
आ. अकस्मात् एक लहान मुलगी येऊन माझ्या मांडीवर काही क्षण बसली. त्या वेळी मला पुष्कळ आनंद झाला अन् माझी भावजागृती झाली.
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या नादशक्तीने आमच्यावर अशा अनुभूतींचा वर्षाव केला.
‘हे जगदंबे, जगज्जननी, तूच प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आहेस. तूच आमचे रक्षण आणि पोषण करत असून आमच्यावर कृपा अन् प्रेम यांचा वर्षाव करत आहेस. तूच हिंदु राष्ट्राची स्थापना करणार आहेस.
हे माते, ‘आम्हा सर्वांना तुझ्या हातातील साधन बनव. आमच्या मनात सतत तुझेच विचार राहू देत. आम्हाला सतत तुझेच दिव्य गुणगान करता येऊ दे. तुझ्या सत्सेवेत आमचा देह चंदनासारखा झिजू दे. तुझ्या चरणकमलांशी आम्हाला संपूर्णपणे एकरूप होता येऊ दे’, अशी तुझ्या चरणी कळकळीची प्रार्थना आहे.’
– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (१७.१०.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |