१. अभ्यास आणि आध्यात्मिक संशोधन करण्यासाठी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधिकेला गोव्यातील ‘सुखसागर’ येथे बोलावणे
‘वर्ष २००१ मध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या एका साधिकेला ‘सुखसागर’, फोंडा, गोवा येथे वास्तव्यास बोलावले. यामागे ‘आश्रमातील चैतन्य, स्तोत्रपठण, आरती, यज्ञयाग इत्यादींचा ‘तिला त्रास देणार्या वाईट शक्तीवर काय परिणाम होतो’, याचे संशोधन करणे’, हा हेतू होता.
२. साधिकेचा आध्यात्मिक त्रास वाढू नये; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी तिचा वावर असलेल्या भागांत न जाणे
ती साधिका आश्रमात आल्यावर तिला स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी दिली. ‘सुखसागर’मध्ये चैतन्य अधिक असल्याने त्या चैतन्याचा त्रास वाईट शक्तीच्या त्रास असल्यामुळे त्या साधिकेला होत असे. त्या साधिकेला आणखी त्रास होऊ नये; म्हणून कृपाळू गुरुदेव आश्रमाच्या ज्या भागात ती साधिका वावरत असे, त्या भागात २ मास गेले नाहीत. याचे कारण परात्पर गुरु डॉक्टरांमध्ये अधिक चैतन्य आहे.
३. एका संतांनी अमावास्येला करण्यास सांगितलेला उपाय केल्यावर साधिकेला त्रास देणार्या वाईट शक्तीला त्रास होणे
३ अ. संतांनी सांगितलेला उपाय केल्यावर साधिकेला त्रास देणार्या वाईट शक्तीला अधिक त्रास होणे आणि साधिकेला अधिक त्रास होऊ नये; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी ती असलेल्या ठिकाणी न जाणे : परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रांचे विद्रुपीकरण होणे, आश्रमातील भिंतींवर ओरखडे उमटणे, डाग पडणे इत्यादी त्रासांवर अनेक संत परात्पर गुरु डॉक्टरांना विविध उपाय करायला सांगत. एका संतांनी अमावास्येला एक उपाय करण्यास सांगितला. तो उपाय दुपारी १२ वाजता करायचा होता. हा उपाय केल्यावर त्या साधिकेला त्रास देणार्या वाईट शक्तीचा त्रास अधिक वाढला होता, तरीही परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्या अभ्यासिकेत शांत आणि स्थिरपणे बसले होते. ‘त्या सूक्ष्मातील वाईट शक्तीला अधिक त्रास झाला, तर साधिकेलाही त्रास होईल’; म्हणून ते साधिका असलेल्या ठिकाणी गेले नाहीत.
४. परात्पर गुरु डॉक्टरांनी तीव्र आध्यात्मिक त्रास असणार्या अन्य साधकांनाही ‘सुखसागर’ येथे बोलावून संतांकडून त्यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून घेणे
‘सनातन संस्थेतील अनेक साधकांना आध्यात्मिक त्रास होता. त्यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्याने त्यांना त्रास देणार्या वाईट शक्तींचे त्रास वाढत असे. ‘प्रत्येक वाईट शक्तीच्या त्रास देण्याची पद्धत, कालावधी इत्यादी वेगवेगळे आहे’, हे लक्षात आल्यावर अशा सर्व साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांनी फोंडा येथील ‘सुखसागर’ येथे बोलावले. अनेक संतांकडून त्यांच्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय करून घेतले.
५. वाईट शक्तींचे त्रास वाढल्याचा परिणाम आश्रमाच्या वास्तूवरही होणे, परात्पर गुरु डॉक्टरांनी त्याचा अभ्यास करणे आणि लिखाण अन् छायाचित्रणही करून घेणे
साधकांना त्रास देणार्या वाईट शक्तींचे त्रास वाढल्यावर त्याचे त्रासदायक परिणाम वास्तूवरही होऊ लागले, उदा. भिंतींवर डाग पडणे, ओरखडे उमटणे, अकस्मात् उपकरणे नादुरुस्त होणे, वातावरणातील दाब वाढणे इत्यादी. परात्पर गुरु डॉक्टरांनी या सर्व त्रासांचा अभ्यास केला. या सर्व त्रासांचे प्रतिदिन निरीक्षण करून ‘त्यांत कोणते पालट होतात ?, कोणत्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांनी हे त्रास न्यून होतात ?’, या गोष्टींचे लिखाण आणि छायाचित्रण करून घेतले. त्यांनी पुढील अनेक पिढ्यांसाठी या अद्भुत अन् बुद्धीपलीकडील ज्ञानाचा संचय करून ठेवला आहे.
६. काही संतांनी केलेल्या आध्यात्मिक उपायांमुळे साधकांना शारीरिक त्रास होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी असे त्रासदायक उपाय त्वरित थांबवणे
परात्पर गुरु डॉक्टरांनी आध्यात्मिक उपाय करणार्या संतांना साधकांना होणार्या त्रासाविषयी सांगून त्यांच्यावर उपाय करायला लावले; मात्र या आध्यात्मिक उपायांमुळे साधकांना शारीरिक त्रास होत असत. साधकांचे त्रास पाहिल्यानंतर मात्र परात्पर गुरु डॉक्टरांनी हे त्रासदायक उपाय त्वरित थांबवायला सांगणे.
७. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘सूक्ष्मातील उपाय अधिक परिणामकारक असतात’, हे सांगणे आणि साधकांना देवतांच्या नामजपाद्वारे आध्यात्मिक स्तरावरील उपाय करण्यास शिकवून स्वावलंबी बनवणे
संतांनी केलेल्या सर्व उपायांचा अभ्यास करून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘स्थूल उपायांपेक्षा सूक्ष्मातील उपाय अधिक परिणामकारक असतात’, हे साधकांना शिकवले. त्यांनी सर्वांत साधी आणि सोपी अशी उपायपद्धत साधकांना शिकवली. त्यांनी साधकांना देवतांप्रती भाव वाढवण्यास सांगून देवतांच्या नामजपाने आध्यात्मिक त्रासांवर मात करण्यास शिकवले. अशा प्रकारे त्यांनी साधकांना स्वावलंबी होण्यास शिकवले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्रासाशी लढण्यासाठी साधकांना विविध देवतांचे नामजप, प्रार्थना, मानसपूजा इत्यादी करण्यास शिकवले. त्यामुळे मंद आणि मध्यम आध्यात्मिक त्रास असलेले साधक आपले उपाय स्वतः शोधण्यास सक्षम झाले. त्यांना उपायांसाठी इतरांवर अवलंबून रहावे लागत नव्हते. तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना साहाय्य करण्यासाठी त्यांनी क्षमतेनुसार साधक निवडले. त्यांनी साधकांच्या त्रासांचे निरीक्षण करून सर्व साधकांना त्याविषयी जागरूक केले आणि साधकांना स्वतः उपाय करण्यास सिद्ध करून स्वावलंबी बनवले.
८. अनेक संतांनी साधकांसाठी आध्यात्मिक उपाय करूनही त्रास न्यून न झाल्याने परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः उपाय करून साधकांचे त्रास दूर करणे
जेव्हा अनेक संतांनी आध्यात्मिक उपाय करूनही साधकांचे त्रास न्यून झाले नाहीत, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः साधकांसाठी उपाय करणे चालू केले. या उपायांमध्ये साधकांनी वैखरी वाणीतून सामूहिक नामजप करणे, ध्यानमुद्रा करणे, चक्रांवर उपाय करणे इत्यादी उपाय होते. या उपायांचा अवलंब करून साधकांनी साधनेतील अडथळे न्यून झाल्याची अनुभूती घेतली आहे.’
– सौ. मंगला मराठे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|