‘गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत अष्टांग साधनेसह ‘अनेकांतून एकात येणे’, ‘स्थुलातून सूक्ष्मात जाणे’, ‘व्यक्त भावातून अव्यक्त भावाकडे जाणे’ इत्यादी साधनेचे मूलभूत सिद्धांत (घटक) येतात. ‘साधकाने साधनेमध्ये पुढच्या पुढच्या टप्प्यांकडे जाणे आवश्यक असते’, असे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेले आहे आणि साधकही तसा प्रयत्न करत आहेत. याच अनुषंगाने रामनाथी आश्रमातील श्री. प्रशांत कोयंडे यांनी साधनेच्या मूलभूत तत्त्वांना अनुसरून केलेले प्रयत्न याविषयीची सूत्रे ३१ डिसेंबर २०२४ या दिवशी पाहिली. आज त्यापुढील सूत्रे पाहूया.
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/868620.html
२. व्यक्त भावाकडून अव्यक्त भावाकडे जाणे
२ अ. ‘व्यष्टी प्रकृती आणि समष्टी प्रकृती’ आणि त्यांनुसार होणारी साधना : ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ असे अध्यात्मात म्हटले जाते. ‘गुरुकृपायोगा’नुसार साधना करतांनाही प्रकृतीनुसार साधना केली जाते. ‘व्यष्टी प्रकृती आणि समष्टी प्रकृती’ अशा दोन प्रकारच्या प्रकृती असून प्रत्येकाची त्याच्या प्रकृतीनुसार साधना होत असते. ‘आपली प्रकृती कोणती आहे ?’, हे गुरूंना ठाऊक असते आणि ते आपल्याला त्यानुसार साधना करायला सांगतात; परंतु साधकाने व्यष्टी आणि समष्टी अशी दोन्ही प्रकारची साधना करणे आवश्यक असते. त्यात ‘व्यष्टी प्रकृतीच्या साधकाने समष्टी साधना शिकून ती करण्याचा प्रयत्न करणे’, हा पुढचा टप्पा असतो, तर ‘समष्टी प्रकृतीच्या साधकाने व्यष्टी साधना अधिक चांगली करून समष्टी सेवा परिपूर्ण करणे’, अपेक्षित असते. अशा प्रकारे दोन्हींची योग्य सांगड घातली गेल्यास ईश्वराची कृपा होऊन आनंदप्राप्तीत वाढ होते.
२ आ. व्यष्टी प्रकृतीच्या साधकांचा ‘व्यक्त भाव’ असून समष्टी साधना करणार्यांचा ‘अव्यक्त भाव’ असणे : व्यष्टी प्रकृतीच्या साधकांच्या भावाचे स्वरूप व्यक्त असते, तर समष्टी साधना करणार्यांचा भाव अव्यक्त असतो. काही वर्षांपूर्वी एका भेटीमध्ये एका साधकाने सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना प्रश्न विचारला होता. त्याने विचारले, ‘त्याच्या समवेत सेवा करणारा साधक ठराविक अंतराने भावपूर्ण प्रार्थना आणि उपाय करतो. कधी कधी त्याची भावजागृती होतांना दिसते. मला तसे जमत नाही. त्यावरून मला वाटते, ‘माझ्यात भाव नाही.’ मला त्याच्यासारखे प्रयत्न करता आले पाहिजेत.’ यावर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितले, ‘‘तुम्ही तुमची प्रकृती कोणती आहे, हे आधी समजून घेतले पाहिजे. व्यष्टी प्रकृतीचा साधक सेवा करतांना प्रार्थना, उपाय, भावजागृतीचे प्रयत्न अधिक करील; मात्र समष्टी प्रकृतीच्या साधकाने तो तसे करतो; म्हणून आपण तसे करणे, हे चुकीचे ठरते. समष्टी प्रकृतीच्या साधकाने सेवा परिपूर्ण करण्याच्या प्रयत्नांकडे लक्ष द्यायला हवे. ती त्याची साधना आहे.’’ यातून लक्षात येते की, अव्यक्त भावात राहून गुरूंच्या समष्टी रूपाची सेवा करणे आवश्यक आहे. ती करण्याचा प्रयत्न करायला हवा. अशा साधकांच्या साधनेमध्ये व्यष्टीचे प्रमाण कमी, तर समष्टीचे प्रमाण अधिक असणार. यामुळे प्रत्येक साधकाने स्वतःची आणि इतर साधकांची प्रकृती समजून घेतली पाहिजे.
२ इ. दैनिकाची सेवा समष्टी सेवा असून ती व्यक्त भावाऐवजी अव्यक्त भावाकडे अधिक नेणारी असल्याचे जाणवणे : स्वतःचा विचार केल्यावर ‘माझी प्रकृती समष्टी आहे’, असे माझ्या लक्षात येते. त्यामुळे माझ्याकडून व्यष्टी साधनेऐवजी समष्टीचा अधिक विचार होतो. दैनिकाची सेवा करतांना ती समष्टी सेवा आहे आणि ती व्यक्तऐवजी अव्यक्त भावाकडे अधिक जाणारी आहे. मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या सत्संगासाठी जाण्याचा निरोप मिळाल्यावर ‘सत्संगासाठी जाऊ नये’, असा माझा विचार होता. ‘दैनिक कार्यालयातील साधकांची संख्या अल्प आहे आणि सत्संगाची वेळ ही दैनिकाच्या सेवेची घाईची वेळ होती. मी सत्संगाला गेल्यावर अन्य साधकांवर सेवेचा ताण येऊ शकतो आणि पुढे सेवा वेळेत करण्यास समस्या निर्माण होईल’, असा विचार त्यामागे होता. ‘दैनिकातील घाईची वेळ सोडून अन्य वेळी आपण सत्संगासाठी जाऊ शकतो’, असाही विचार माझ्या मनात होता; परंतु मी तसे काही सांगितले नाही आणि सत्संगासाठी गेलो. सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांशी बोलतांना मी वरील स्थिती सांगत ‘‘मी सत्संगाला येणार नव्हतो’’, असे सांगितले. त्यावर त्यांनी ‘‘मग का आलात ?’’ असा प्रश्न विचारल्यावर मी ‘‘परेच्छेने आलो’’ असे प्रामाणिकपणे सांगितले. त्यावर ते हसले. मी पुढे म्हणालो, ‘‘जर येण्याचे टाळले असते, तर साधकांनी बरेच प्रश्नही विचारले असते. यात ‘नकारात्मकता आहे का ?’ ‘मनाच्या स्तरावर अन्य काही समस्या आहेत का ?’, असेही प्रश्न असू शकले असते.’’ त्यावर गुरुदेवांनी हे लिहून देण्यास सांगितले. कदाचित् मी आधीच (घाईच्या वेळी) न जाण्याचे आणि नंतर योग्य वेळेनुसार जाण्याचे कारण स्पष्ट केले असते, तर असे प्रश्न उपस्थित झाले नसते, हेही तितके खरे आहे. (क्रमश:)
– श्री. प्रशांत कोयंडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२४)
याच्या नंतरचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/869261.html
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |