चिपळूण – तालुक्यातील अलोरे येथील मो.आ. आगवेकर हायस्कूल आणि सीए. वसंतराव लाड कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक अरुण केशव माने यांनी सेवानिवृत्ती पश्चात कालखंडात शाळा-संस्था समन्वयक म्हणून भूमिका बजावत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या सेवा योगदानाबद्दल, परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात नुकताच त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अभ्यासक सौरभ रामचंद्र बोडस, संस्थाध्यक्ष, निवृत्त एअरमार्शल हेमंत भागवत, उपकार्याध्यक्ष विजयकुमार ओसवाल उपस्थित होते.
सन्मानापूर्वी माने यांचा विशेष परिचय करून देण्यात आला. ‘विद्यार्थीप्रिय शिक्षक’ म्हणून परिचित मानेसर हे अलोरे शाळेचे पहिले मुख्याध्यापक आणि जिल्ह्यात सर्वाधिक काळ मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावलेल्या मो.आ. आगवेकरसरांच्या कार्यकाळापासून शाळेत कार्यरत होते. मानेसरांच्या अलोरे कारकीर्दीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या एकूण अनुमाने ९ सहस्र विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक विद्यार्थी आजही त्यांच्या थेट संपर्कात आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी अलोरे शाळेच्या सर्वांगीण उन्नतीसाठी स्वत:चे अमूल्य योगदान कायम ठेवले आहे. विशेष म्हणजे अलोरे शाळेसाठी विज्ञान शाखेची मान्यता, अटल टिंकरिंग लॅब उभारणी, शाळेचा सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभ, जलसंपदा खात्यासह शाळेच्या शासकीय पातळीवरील विविध प्रलंबित कामात सतत लक्ष, शाळेतील ‘शततप प्रणाम’ आदि उपक्रम, शाळेच्या माजी परदेशस्थ विद्यार्थ्यांशी संपर्क, ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना आपलेसे करण्याचा स्वभाव आदि त्यांच्या समर्पितभावनेची दखल घेऊन संस्थेने हा विशेष सत्कार केला. संस्थेच्या गुरुदक्षिणा सभागृहात हा कार्यक्रम झाला.
या सत्कारास उत्तर देतांना श्री. अरुण माने म्हणाले की, या सत्कारामुळे आपल्या कामावरच्या निष्ठा कायम झाल्या, तसेच काम करायला अधिक ऊर्जाही मिळाली.