श्रीक्षेत्र चौंढाळा (छत्रपती संभाजीनगर) येथे नामफलक आणि दानपेटी यांवरून वाद !

पुजार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद !

श्रीक्षेत्र चौंढाळा येथील श्री रेणुकादेवी

विहामांडवा – पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चौंढाळा येथील श्री रेणुकादेवी मंदिरात १६ ऑक्टोबर या दिवशी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी अधिकारी आले होते. या अधिकार्‍यांसमोरच नियुक्त नवरात्र उत्सव समिती आणि पुजारी वानोळे बंधू यांच्यात मंदिर समितीचा नामफलक लावणे अन् दानपेटी मंदिरात ठेवण्यावरून वाद झाला. या प्रकरणी मंदिराचे पुजारी संग्राम वानोळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (मंदिरात आल्यानंतर शांती आणि आनंद मिळतो; म्हणून भाविक मंदिरात येत असतात. नवरात्रोत्सवात भाविकांसमोर असे वाद घालून नवरात्रोत्सव समिती आणि पुजारी यांतून काय साध्य करत आहेत ? – संपादक)

पुजारी संग्राम कमलाकर वानोळे यांनी एका थोर महापुरुषाविषयी अपशब्द वापरल्याने प्रकरण थेट पोलीस ठाण्यापर्यंत गेले. पहिल्या आणि दुसर्‍या माळेलाच वादाची ठिणगी पडल्याने भाविकांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली. तहसीलदार सारंग चव्हाण यांनी समजावून सांगण्याचाही प्रयत्न केला. तरीही त्याचा काही उपयोग झाला नाही. एका महापुरुषाविषयी एकेरी भाषा वापरून अवमान केल्याने आणि समितीने लावलेला फलक काढून फेकल्याने उपस्थित काही लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे चौंढाळा येथील प्रमोद काळे यांनी पाचोड पोलीस ठाण्यात वानोळे बंधू यांच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केली.