बेंगळुरू (कर्नाटक) – इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाच्या संदर्भात भारताने भूमिका पालटली पाहिजे. ‘इस्रायल निर्माण कसे झाले ?’, याविषयी माहिती नसलेले आज इस्रायलच्या बाजूने वाद घालत आहेत. माणुसकी म्हणून ज्यू लोकांना रहाण्यास ठिकाण मिळावे; म्हणून पॅलेस्टाईन लोकांनी भूमी दिली; परंतु आज इस्रायल पॅलेस्टाईनच्या लोकांवरच वार करत आहे. संयुक्त राष्ट्रांकडून चालवण्यात येत असलेल्या शाळांवर इस्रायलने बाँब टाकल्याने ३० मुले आणि कर्मचारी मृत्यूमुखी पडले आहेत; परंतु इस्रायला कुणी आतंकवादी राष्ट्र म्हणत नाही, असा थयथयाट बंदी घालण्यात आलेली जिहादी आतंकवादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे (एस्.डी.पी.आय.चे) प्रदेशाध्यक्ष अब्दुल माजिद यांनी सांगितले.
सौजन्य: news4 24×7
माजिद म्हणाले की,
१. वर्ष १९४६ मध्ये पॅलेस्टाईनमधील थोड्याशा जागेत ज्यू रहात होते. वर्ष १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी तडजोड करून काही जागा इस्रायलला दिली होती. आता मात्र त्यातील थोडासाच भाग पॅलेस्टाईनकडे उरला आहे.
२. भारतात म. गांधी, नेहरू, वाजपेयी, नेहरू या सर्वांनीच पॅलेस्टाईनला पाठिंबा दिला होता. (भारतातील मुसलमान दुखावू नयेत; म्हणून आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी पॅलेस्टाईनला चुचकारले. आता सत्तेत असलेल्या भाजप सरकारने याविषयी धोरण पालटल्याने धर्मांधांना पोटशूळ उठला आहे ! – संपादक) आम्हीही पॅलेस्टाईनच्या बाजूने आहोत.
३. ९ सहस्र पॅलेस्टाईनच्या लोकांना कारागृहात ठेवून इस्रायल त्रास देत आहे. माध्यमांनी पॅलेस्टाईनची तुलना आतंकवादाशी केली आहे. हा आतंकवाद नाही. तो पॅलेस्टाईनचा स्वातंत्र्यसंग्राम आहे. (काश्मीरमध्ये घुसून आतंकवादी कारवाया करणार्या पाकपुरस्कृत अतंकवाद्यांनाही ‘स्वातंत्र्यासाठी लढणारे’ म्हणून रंगवले जाते; मात्र सत्य सर्वांना ठाऊक आहे ! – संपादक)
४. भारत ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी जसा लढला, तसा पॅलेस्टाईन इस्रायलच्या विरोधात लढत आहे. भारताने इस्रायलच्या बाजूने उभे राहू नये. स्वातंत्र्यासाठी लढत असलेल्या पॅलेस्टाईनच्या बाजूने उभे रहावे.
संपादकीय भूमिकाभारत गेली कित्येक दशके जिहादी आतंकवादाने त्रस्त आहे. त्यामुळे इस्रायल जे भोगत आहे, त्याला भारतापेक्षा अधिक कोण समजू शकेल ? पॅलेस्टाईनच्या बाजूने बोलणार्या एस्.डी.पी.आय.ने हमासने केलेल्या अमानुष क्रौर्याविषयी बोलावे. ‘हमास एक आतंकवादी संघटना आहे’, असे एस्.डी.पी.आय. का सांगत नाही ? |