तेल अविव – हमासने केलेल्या आक्रमणानंतर इस्रायलकडून गाझा पट्टीवर प्रत्युत्तरादाखल आक्रमण केले जात आहे. युद्धाच्या १० व्या दिवशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी ट्वीट करून स्पष्ट केले की, युद्धविराम करण्यात येणार नाही.
इस्रायलच्या पहिल्या आपत्कालीन बैठकीनंतर नेतान्याहू म्हणाले की, हमासने आमच्यावर आक्रमण केल्यानंतर तिला वाटले की, आम्ही पराभूत होऊ; मात्र आम्ही हमासला नष्ट करूनच थांबू.
इस्रायलने लेबनॉन सीमेच्या परिसरातील नागरिकांना हटवले !
इस्रायलने त्याच्या लेबनॉन सीमेच्या परिसरातील नागरिकांना तेथून स्थलांतरित करण्यास प्रारंभ केले आहे. येथील २ किलोमीटर परिसरात रहाणार्या लोकांना हटवून त्यांना सुरक्षितस्थळी नेले आहे. हमासने इस्रायलवर आक्रमण केल्याच्या दुसर्या दिवसापासून लेबनॉनमधील हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेकडून इस्रायलवर आक्रमण करण्यात येत आहे. त्यापासून नागरिकांचे रक्षण होण्यासाठी आणि हिजबुल्लाच्या आतंकवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी येथील नागरिकांना हटवण्यात आले आहे.