भारतात ४५ दिवस चालणार्या ‘एक दिवसांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धे’ला ५ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेसाठी १० देशांचे खेळाडू भारतात आले आहेत. या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाचाही सहभाग आहे. प्रत्येकच संघातील खेळाडूंचे भारतात आल्यावर स्वागत करण्यात आले. ‘या स्पर्धेच्या कालावधीत कुठल्याही संघाला ‘बीफ’ (गोमांस) मिळणार नाही’, हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पर्धेच्या आधीच स्पष्ट केले आहे. यामुळे पाकिस्तानातील काही संतापलेले क्रिकेटप्रेमी ‘महत्त्वाच्या स्पर्धेत पाक संघाला ‘बीफ’ न देणे, हा भारताचा कट आहे. त्यामुळे प्रथिने पुरेशा प्रमाणात मिळणार नाहीत. परिणामी पाक संघ सामने जिंकू शकणार नाही’, अशा प्रकारे भारतावर टीका करत आहेत. या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून पसरत आहेत. याची दुसरी बाजू म्हणजे पाकिस्तानी यूट्यूबचा निवेदक सना अमजदने पाकमधील लोकांच्या घेतलेल्या मुलाखतीतील या व्हिडिओत काही जण ‘गोमांस मिळाले नाही, तरी पाक खेळाडूंना विशेष अडचण येणार नाही’, असे म्हणत या निर्णयाचे समर्थन करत आहेत. पाक क्रिकेट संघाच्या कर्णधारासह अन्य खेळाडू भारतातून मिळणार्या सुविधा आणि पाठिंबा यांविषयी कौतुक करत आहेत.
खरे पहाता कुठल्याही स्पर्धेचे ठराविक नियम असतात आणि ते पाळणे संघातील प्रत्येक सदस्यासाठी बंधनकारक असते. ज्या देशात स्पर्धेचे आयोजन केलेले असते, तेथील संस्कृतीचाही त्यावर प्रभाव असतो. गेल्या वर्षी कतार या मुसलमानबहुल देशात झालेल्या ‘फुटबॉल विश्वचषक’ स्पर्धेत सहभागी सर्व ३२ संघांना स्पर्धा कालावधीत ‘वाईन’वर बंदी घातली होती. त्या वेळीही वाद झाला होता; पण त्या नियमात कोणताही पालट करण्यात आला नाही. ३३ कोटी देवतांचा वास असलेली गोमाता भारतातील हिंदूंसाठी पूजनीय आहे. त्यामुळे स्पर्धा कालावधीत खेळाडूंना गोमांस खाण्यास बंदी घालण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय अभिनंदनीय आहे. अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनापोटी सरकारकडून भारतियांसाठी देवतेसमान असलेल्या गोमातेच्या रक्षणासाठी प्रयत्न होत नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोमांसाची वाढती मागणी आणि धर्मांधांकडून भारतात प्रतिदिन शेकडो गोवंशियांची कत्तल होण्याचे प्रमाण भीषण आहे. त्यामुळेच पाकमधील लोकांची अशी मागणी करण्याचे धैर्य होते, हे लक्षात घ्या !
– श्री. संदेश नाणोसकर, देवद, पनवेल.