अपघातात २० घायाळ
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील वैजापूरजवळील समृद्धी महामार्गावर जांबर गावाजवळ थांबलेल्या ट्रकला खासगी बस धडकून झालेल्या अपघातात १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर २० प्रवासी घायाळ झाले आहेत. ही घटना १४ ऑक्टोबरच्या रात्री १ वाजता घडली. बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी नाशिक येथील काही भाविक खासगी बसने तेथे गेले होते, त्या वेळी ही घटना घडली. या अपघातात ४ मासांच्या बालकाचाही समावेश आहे.
दर्शन घेऊन परत नाशिक येथे येत असतांना मध्यरात्री हा अपघात झाला. वैजापूर येथील शासकीय रुग्णालय आणि छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात घायाळ झालेल्यांना भरती करण्यात आले आहे. यातील सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी आहेत.
मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांचे साहाय्य !
या अपघाताविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी प्रत्येकी ५ लाख रुपये आर्थिक साहाय्याची घोषणा केली असून घायाळ झालेल्यांवर शासकीय व्ययाने योग्य ते उपचार करावेत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.
संपादकीय भूमिकासमृद्धी महामार्गावर वारंवार होणार्या भीषण अपघातांची कारणे शोधून प्रशासनाने त्यावर उपाययोजना काढणे अपेक्षित ! |