जुन्नर, शिरूर तालुक्यांमध्ये (पुणे) २०० किलो ‘अल्प्राझोलम’चा साठा जप्त !

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – मुंबईतील एन्.सी.बी.च्या (अमली पदार्थविरोधी पथक) पथकाने जुन्नर, शिरूर तालुक्यांमधील २०० किलो ‘अल्प्राझोलम’चा साठा जप्त केला आहे. या ‘अल्प्राझोलम’चा वापर मनोविकारांसाठी लागणार्‍या औषधांसाठी केला जातो; परंतु याचा वापर अमली पदार्थ सिद्ध करण्यासाठी केला जात असावा असा संशय एन्.सी.बी.तील अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे. या तालुक्यांमध्ये ‘अल्प्राझोलम’ची विनाअनुमती निर्मिती होत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. एन्.सी.बी.च्या पथकाने याविषयीची माहिती स्थानिक पोलिसांना दिली असून पुढील कारवाई चालू असल्याची माहिती एन्.सी.बी.च्या अधिकार्‍यांनी दिली.

मनोविकार आणि चिंताविकार यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना झोप येण्यासाठी ‘अल्प्राझोलम’चा उपयोग केला जातो; परंतु गेल्या काही वर्षांपासून अमली पदार्थांचे सेवन करणारे तरुण झोपेच्या गोळ्यांचा नशेसाठी उपयोग करत असल्याचे आढळून आले आहे.