दाभोलकर-पानसरे हे खटले केवळ राजकीय कारणांनी प्रेरित ! – डॉ. अमित थढानी, लेखक

‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ या निर्भीड पुस्‍तकाच्‍या पुणे येथील प्रकाशन सोहळ्‍याचा वृत्तांत !

डॉ. अमित थडानी

पुणे – जोपर्यंत एखाद्या फोडातील ‘पू’ बाहेर काढल्‍याविना रोगी बरा व्‍हायला आरंभ होत नाही, तसेच आतील घाण बाहेर काढल्‍याविना ही स्‍थिती सुधारणार नाही, याची जाणीव झाल्‍याने मी ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’ हे पुस्‍तक लिहिले. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सिद्ध करण्‍यात आला होता; पण तो हिंदु धर्माच्‍या विरोधात असल्‍याने पारित झाला नाही; पण डॉ. दाभोलकरांच्‍या हत्‍येनंतर त्‍यांच्‍या स्‍मृतीनिमित्त तो पारित झाला. दाभोलकर यांचा नक्षलवाद्यांशी असणार्‍या आर्थिक व्‍यवहारांचा कुठेही उल्लेख केला जात नाही; मात्र सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांचे भ्रमणभाष ध्‍वनीमुद्रित करून खोट्या आरोपांखाली त्‍यांना अटक झाली. कुणालाही ‘या हत्‍या कुणी केल्‍या’, हे शोधण्‍यात रस नसून केवळ राजकीय कारणांनी हे खटले प्रेरित आहेत. पूर्वग्रहानुसार आधीच निश्‍चित केलेले खुनी, त्‍या दृष्‍टीने जुळवलेले पुरावे, आधीच बेपत्ता असलेले संशयित आणि प्रत्‍येक आरोपपत्रात नवे आरोपी यांमुळे दाभोलकर-पानसरे हत्‍याकांडाचे अन्‍वेषण न्‍यायासाठी नसून राजकारणासाठी चालले आहे, असे परखड उद़्‍गार सुप्रसिद्ध शल्‍य चिकित्‍सक डॉ. अमित थढानी यांनी केले. येथे एका कार्यक्रमात ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’, या पुस्‍तकाचे प्रकाशन करण्‍यात आले. त्‍या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला स्‍वातंत्र्यवीर सावरकर स्‍मृती प्रतिष्‍ठानचे महामंत्री श्री. विद्याधर नारगोलकर यांसह २०० हून अधिक जणांची उपस्‍थिती होती.

डॉ. थढानी यांचे पुरोगाम्‍यांनी भयभीत केलेल्‍या वातावरणात हात घालण्‍याचे धाडस ! – प्रथितयश फौजदारी अधिवक्‍त्‍या सुवर्णा आव्‍हाड, मुंबई उच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍त्‍या सुवर्णा आव्‍हाड

डॉ. थढानी यांना सामाजिक भान आणि विवेकबुद्धी असल्‍याने त्‍यांनी हे लेखन केले. सरकारी साक्षीदार म्‍हणून डॉ. दाभोलकर यांचा मुलगा डॉ. हमीद दाभोलकर यांना डॉ. थढानी यांच्‍या विधानांचा कोणताही पुरावा देता आला नाही. उलट तपासणीतही ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. वास्‍तवापेक्षा ‘आम्‍हाला जे हवे, ते न्‍यायालयासमोर आले पाहिजे’, असा अंनिसचा प्रयत्न आहे. पुरोगाम्‍यांनी भयभीत केलेल्‍या वातावरणात हात घालण्‍याचे धाडस करत सत्‍य पुढे आणण्‍याचा प्रयत्न डॉ. थढानी यांनी केला आहे. सनातन आणि हिंदुत्‍वनिष्‍ठ यांना अडकवण्‍यासाठी खोटी वक्‍तव्‍ये पसरवण्‍यात आली. पुरोगामी आतंकवाद्यांना पुरून उरणारे अधिवक्‍ता संजीव पुनाळेकर यांच्‍यावरही खोटे आरोप करून त्‍यांना अटक करण्‍यात आली. डॉ. थढानी यांची शब्‍दांची पारदर्शकता आणि असाधारण धाडस हे वाखाणण्‍याजोगे आहे.

रोगी विचारांना उघडे पाडण्‍यासाठी चिरफाड करण्‍याचे कार्य डॉ. थढानी यांनी केले ! – विवेक सिन्‍नरकर, ज्‍येष्‍ठ हिंदुत्‍वनिष्‍ठ लेखक

अनेक क्रांतीकारकांना प्रेरणा देणारे स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांच्‍याकडे जी लेखणी होती, तेच त्‍यांचे शस्‍त्र होते. ‘याने मी संपूर्ण ब्रिटीश साम्राज्‍याचा अंत करीन’, असे सांगून त्‍यांनी ते करून दाखवले. श्रीकृष्‍णाने हाती शस्‍त्र न घेता कुरुक्षेत्रावर विजय मिळवून दिला, तसेच ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’, हे पुस्‍तक म्‍हणजे शस्‍त्र आहे. रोगी विचारांना उघडे पाडण्‍यासाठी चिरफाड करण्‍याचे कार्य डॉ. थढानी यांनी केले आहे. ज्‍यांना हिंदुत्‍व, महाशक्‍ती झालेला भारत आणि सनातन धर्म नको आहे, अशा शक्‍ती एकत्र आल्‍या आहेत. त्‍यासाठी हिंदु संघटनांनी एकत्र यावेे. राष्‍ट्रवाद आणि साम्‍यवादी यांची चालू असलेली लढाई जिंकण्‍यासाठी सर्वांनी साधना वाढवावी. हिंदुु संघटनांनी सर्व हिंदूंना एकत्र करून सनातन धर्माकडे वळवावे. दक्षिण आणि पूर्व भारतात रा.स्‍व. संघ कार्यकर्त्‍यांच्‍या हत्‍या होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी सजग रहावे.

खटला चालू द्यायचा नाही आणि आरोपींना कोठडीबाहेर येऊ द्यायचे नाही, हे कटकारस्‍थान ! – अधिवक्‍ता भरत देशमुख, माजी अध्‍यक्ष, महाराष्‍ट्र-गोवा बार कौन्‍सिल

खटला चालू द्यायचा नाही आणि आरोपींना कोठडीबाहेर येऊ द्यायचे नाही, असा कट आखण्‍यात आला आहे. डॉ. थढानी यांनी १० सहस्र पानांच्‍या आरोपपत्रांचा अभ्‍यास करून जे बारकावे खटल्‍यात लिहिले, त्‍यानुसार ‘त्‍यांना वकिलीची सनद द्यावी’, असे वाटत आहे. दाभोलकर हत्‍याकांड अन्‍वेषण हे कसे भरकटवले, याचे सविस्‍तरपणे वर्णन त्‍यांनी ‘दाभोलकर-पानसरे हत्‍या : तपासातील रहस्‍ये ?’, या पुस्‍तकात केले आहे. ‘जया अंगी मोठेपण तया यातना कठीण’ असेच या प्रकरणातील निरपराध आरोपींविषयी मला म्‍हणावेसे वाटते.

खर्‍या आरोपींना कुणी शोधलेलेच नाही ! – डॉ. अमित थढानी

डॉ. दाभोलकरांच्‍या हत्‍येसह कॉ. पानसरे यांच्‍या प्रकरणात करण्‍यात आलेली कथानके आणि आरोपींची अटक हे सर्व षड्‌यंत्र आहे. खर्‍या आरोपींना कुणी शोधलेलेच नाही. केवळ एका हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनेला गोवण्‍याचे काम यंत्रणांनी केले आहे.