गोव्यात विना क्रमांक (नंबर प्लेट नसलेल्या), तसेच अस्पष्ट वाहन नोंदणी क्रमांक असलेल्या वाहनांचा सुळसुळाट !

(प्रतिकात्मक चित्र)

पणजी : गोव्यात सर्वत्र वाहन नोंदणी क्रमांक पट्टी (नंबरप्लेट) नसलेल्या वाहनांची ये-जा वाढली आहे. यात बहुतांश दुचाकी, तर काही प्रमाणात चारचाकी वाहनांचाही समावेश असल्याचे आढळून येते. अशा वाहनांचे चालक लोकांच्या जिवाला धोका उत्पन्न होईल, अशा पद्धतीने वाहने रस्त्यावरून सुसाट पळवतात. ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने मडगाव, फोंडा, पणजी, म्हापसा आणि पर्वरी या भागांत केलेल्या पहाणीत राज्यातील वाहनचालकांची बेशिस्त वर्तणूक दिसून आली.

१. अनेक दुचाकीस्वार मुख्य रस्त्यावर ‘स्टंट’बाजी (धाडसी पद्धतीने दुचाकी चालवणे) करतांनाही आढळत आहेत. अनेक जण नियमबाह्य पद्धतीने म्हणजे अतीवेगाने वाहन चालवणे, दुचाकीवर ३ जणांनी बसून प्रवास करणे आदी कृती सर्रासपणे करतांना आढळतात.

२. पणजी, पर्वरी भागांत अशा प्रकारे वाहन चालवून वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. अनेकदा बेशिस्त दुचाकीस्वार चौकाचौकांत लागलेले सिग्नल आणि सी.सी.टी.व्ही. कॅमेरे यांनाही जुमानत नाहीत.

३. अनेक वाहनांच्या ‘नंबरप्लेट’वरील आकडे लक्षात येणार नाहीत, अशा प्रकारे आढळतात. काही वाहनांच्या ‘नंबरप्लेट्स’ तुटलेल्या स्थितीत असतात अथवा त्यातील एखादा क्रमांकच नसतो.

४. अनेक दुचाकी वाहनांच्या ‘सायलेंसर’मध्ये अवैधपणे पालट करून मोठा आवाज किंवा फटाक्यांचा आवाजसुद्धा काढला जात आहे. याला घाबरून सामान्य, तसेच महिला आणि वयस्कर वाहनचालकांपुढे अपघातसदृश परिस्थिती निर्माण होते. त्याचप्रमाणे रात्री-बेरात्री अशी वाहने रस्त्यावरून मोठ्याने आवाज करत चालवली जातात. रात्रीच्या वेळी याच्या आवाजामुळे १ ते दीड कि.मी. परिसरातील शांतता भंग पावते.

५. विना ‘नंबरप्लेट’, तसेच अस्पष्ट ‘नंबरप्लेट’ असलेल्या वाहनांमुळे रस्त्यावर अपघाताचा प्रसंग घडल्यास त्या वाहनाची नोंदही उपस्थितांना घेता येत नाही. अपघाताच्या प्रसंगात असे वाहनचालक थांबून अपघातग्रस्तांची साधी विचारपूसही न करता तेथून पळ काढतात.

चौकाचौकांत आधुनिक यंत्रणा असूनही वाहतूक प्रशासन या संदर्भात कारवाई का करत नाही ? असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.