विहामांडवा आणि हिरडपुरी येथे कडकडीत बंद !
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील एका समाजकंटकाने सामाजिक माध्यमांमध्ये १ आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून एका समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विहामांडवा बाजारपेठेसह हिरडपुरी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला, तर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना ८ ऑक्टोबर या दिवशी पाचोड येथे निवेदन देण्यात आले आहे.
‘विहामांडवा व्यापारी महासंघा’चे अध्यक्ष राजेंद्र पन्हाळकर यांच्यासह काही नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माथेफिरू समाजकंटकाने आक्षेपार्ह पोस्ट करून हिंदु आणि मुसलमान समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. ‘त्याला शिक्षा करावी’, अशी मागणी केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विहामांडवा येथील व्यापार्यांनी स्वतःची प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवून सहभाग नोंदवला.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून विहामांडवा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या प्रसंगी पाचोड येथील सरपंच शिवराज भुमरे यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.