१. राग – सामंत सारंग
अ. ‘श्री. संजय मराठे ‘सामंत सारंग’ राग गाऊ लागल्यावर माझ्या अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली. गायनाला आरंभ झाल्यावर सुषुम्ना नाडी लगेच कार्यरत झाल्यामुळे ‘श्री. संजय मराठे यांच्या गायनातून उच्च स्तराची स्पंदने प्रक्षेपित होत आहेत’, हे लक्षात आले.
आ. श्री. मराठे गात असतांना ‘आपण चैतन्याच्या सागरातच आहोत’, असे मला जाणवू लागले.
इ. सामंत सारंग रागाचा परिणाम अंतिमतः विशुद्धचक्रावर होत असल्याचे लक्षात आले.
ई. सामंत सारंग राग ऐकत असतांना अचानक माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला.
उ. सामंत सारंग रागातून तारक स्पंदने ७० टक्के आणि मारक स्पंदने ३० टक्के प्रक्षेपित होत असल्याचे मला जाणवले.
२. राग – चंद्रकंस
अ. श्री. संजय मराठे यांनी चंद्रकंस रागाच्या गायनाला आरंभ केल्यावर मला माझ्या विशुद्धचक्रावर स्पंदने जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
आ. थोड्याच वेळात मला माझ्या सहस्रारावर स्पंदने जाणवू लागली.
इ. काही वेळाने चंद्रकंस रागाची स्पंदने मला मूलाधारचक्रावर जाणवू लागली.
ई. मला अचानक दत्तगुरूंची आठवण आली; म्हणून मी चंद्रकंस रागामधील देवतातत्त्वे शोधून काढली. चंद्रकंस रागामध्ये दत्ततत्त्व ७० टक्के असल्याने ‘मला अचानक दत्तगुरूंची आठवण का आली ?’, याचे कोडे उलगडले.
उ. नंतर चंद्रकंस रागातून शक्तीची स्पंदने जाणवू लागली. या रागामध्ये मारक तत्त्व ८० टक्के आणि तारक तत्त्व २० टक्के असल्याचेही जाणवले.
ऊ. शेवटी चंद्रकंस रागाचा परिणाम मणिपूरचक्रावर जाणवू लागला. मणिपूरचक्र हे तेजतत्त्वाशी संबंधित आहे आणि चंद्रकंस रागातूनही शक्तीचीच स्पंदने प्रक्षेपित होत होती. यावरून ‘चंद्रकंस राग हा मारक तत्त्व आणि शक्ती यांच्याशी संबंधित आहे’, हे लक्षात आले.
३. राग – रामकली
अ. श्री. संजय मराठे यांनी गायनाला आरंभ करण्यापूर्वी मला त्या कक्षामध्ये दाब जाणवत होता. तेव्हा तेथील वातावरणात चांगली स्पंदने ४० टक्के आणि त्रासदायक स्पंदने ६० टक्के जाणवत होती.
आ. श्री. संजय मराठे यांनी रामकली रागाच्या गायनाला आरंभ केल्यावर मला त्या रागातून प्रक्षेपित होत असलेली चांगली स्पंदने माझ्या आज्ञाचक्रावर जाणवू लागली.
इ. श्री. मराठे यांच्या चैतन्यमय गायनामुळे वातावरणातील त्रासदायक स्पंदने अल्प होत जाऊन शेवटी पूर्णपणे नाहीशी झाली.
ई. श्री. मराठे खर्जातील स्वर आळवू लागल्यावर मला माझ्या मूलाधारचक्रावर स्पंदने जाणवू लागली आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.
उ. मला वातावरणात शिवतत्त्व जाणवू लागले.
रामकली हा राग सकाळच्या प्रहरी गायला जातो. सकाळी आपण देवाचे नामस्मरण करतो. ‘या रागातील देवता श्रीराम ही तिची आराध्य देवता ‘शिव’ हिचे नामस्मरण करत असल्याने मला वातावरणात रामतत्त्व न जाणवता शिवतत्त्व जाणवले’, असे लक्षात आले. नंतर कळले, ‘श्री. संजय मराठे हेही शिवभक्त आहेत आणि तेही गातांना शिवाचे स्मरण करत असावेत.’
ऊ. रामकली या रागामध्ये मला तारक तत्त्व २० टक्के आणि मारक तत्त्व ८० टक्के जाणवले. या रागात मारक तत्त्व ८० टक्के असूनही मला शक्ती जाणवत नव्हती, तर शांती जाणवत होती. ‘हे वातावरणातील शिवतत्त्वामुळेच आहे’, असे जाणवले.
ए. शेवटी वातावरणातील शांतीचे प्रमाण आणखी वाढले.
रामकली रागाची देवता श्रीराम ही शिवाला आळवत असल्याने आणि शिवामध्ये ज्ञानशक्ती असल्याने मला हे गायन ऐकतांना शेवटपर्यंत आज्ञाचक्रावरच स्पंदने जाणवत होती, तसेच माझी चंद्रनाडी कार्यरत होती.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (६.४.२०२२)
|