तुम्ही देशाचे वाटोळे केले ! – जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्या नागरिकाने सुनावले

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना त्यांच्या नागरिकाने भररस्त्यात सुनावले !

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो

ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना टोरंटोमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता एका सामान्य नागरिकाने त्यांच्या तोंडावर ‘तुम्ही देशाचे वाटोळे केले’ अशा शब्दांत सुनावले. या प्रसंगाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.

१. ट्रुडो हे कार्यक्रमस्थळावरून निघतांना बाहेर त्यांना पहायला आलेल्या नागरिकांना ते अभिवादन करत जात होते. तेथून पुढे जातांना एका व्यक्तीने त्यांना तोंडावर ‘मी तुमच्याशी हस्तांदोलन करणार नाही, तुम्ही देशाचे वाटोळे केले’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

२. जस्टिन ट्रुडो यांनी तेथेच त्या व्यक्तीला ‘मी या देशाची कशी वाट लावली ?’ असा प्रश्‍न विचारला. त्यावर ‘येथे कुणी साधे घर विकत घेऊ शकतो का ? तुम्ही लोकांवर ‘कार्बन टॅक्स’ लावला; पण तुमच्याच ताफ्यात ९ ‘व्हीएट’ गाड्या आहेत’, असे म्हणत ट्रुडो यांच्या ताफ्यात असणार्‍या अत्यंत महागड्या गाड्यांवर त्याने आक्षेप घेतला.

३. ट्रुडो यांनी त्या व्यक्तीला समजवणे चालू केले. ‘तुम्हाला ठाऊक आहे का, कि तुम्ही दिलेल्या कार्बन टॅक्सच्या पैशांचे आम्ही काय करतो ? आम्ही प्रदूषणावर कर आकारतो आणि ते पैसे तुमच्यासारख्या कुटुंबांकडेच परत पाठवतो’, असे ट्रुडो यांनी सांगितले; पण याने त्या व्यक्तीचे समाधान झाले नाही.

४. ‘तुम्ही हा सर्व पैसा युक्रेनला पाठवत आहात’ असा आरोप त्या व्यक्तीने केल्यानंतर ट्रुडो यांनी ‘तुम्ही व्लादिमिर पुतिन यांची भाषणे फार ऐकता, असे वाटते. तुमच्याकडे रशियाविषयी फार चुकीची माहिती आहे’, असे विधान करत तेथून निघून गेले.