गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पंतप्रधानांच्या हस्ते २६ ऑक्टोबरला होणार उद्घाटन ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी, ६ ऑक्टोबर (वार्ता.) –  राज्यात ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २६ ऑक्टोबरपासून चालू होणार आहे. स्पर्धेची सिद्धता पूर्णत्वाकडे आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू मैदानात स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. ही स्पर्धा ९ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथील मंत्रालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला क्रीडामंत्री गोविंद गावडे, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे तांत्रिक समितीचे प्रमुख अमिताभ शर्मा आणि क्रीडा सचिव स्वेतिका सचेन यांची उपस्थिती होती.

३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जागतिक विक्रम करणारी ठरेल !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘ही क्रीडा स्पर्धा इतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांपेक्षा मोठी असेल. गोव्यात एकूण २८ ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत ४३ क्रीडा प्रकार असतील. स्पर्धेत देशभरातील १० सहस्र ८०६ क्रीडापटू सहभाग घेणार आहेत आणि यातील ४९ टक्के खेळाडू या महिला आहेत. स्पर्धेसाठी सुमारे ४ सहस्र ७४० तांत्रिक अधिकारी गोव्यात येणार आहेत. आतापर्यंत ३६ क्रीडा प्रकारांपेक्षा अधिक क्रीडा प्रकार कुठल्याही स्पर्धेत झालेले नाहीत, तसेच १० सहस्रांहून अधिक क्रीडापटूंचा सहभाग आणि त्यामध्ये ४९ टक्के महिला खेळाडू असे पहिल्यांदाच घडत आहे. यामुळे ही स्पर्धा जागतिक विक्रम करणारी ठरणार आहे. फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरू मैदानात होणार्‍या उद्घाटन सोहळ्याला सर्वांना उपस्थित रहाणे शक्य होणार नसल्याने या सोहळ्याचे राज्यात १० विविध ठिकाणी थेट प्रक्षेपण (लाईव्ह स्क्रीनिंग) करण्यात येणार आहे.’’

गोमंतकियांनी संधीचे सोने करावे ! – क्रीडामंत्री गोविंद गावडे

याप्रसंगी क्रीडामंत्री गोविंद गावडे म्हणाले, ‘‘स्पर्धेतील प्रत्येक क्रीडा प्रकारात गोव्यातील खेळाडूंना खेळण्याची संधी मिळणार आहे. या संधीचा गोमंतकीय खेळाडूंनी पुरेपूर लाभ करून घेऊन गोव्याला पदके मिळवून द्यावीत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे कौशल्य विकसित करण्याची संधीही गोमंतकीय खेळाडूंना आहे. क्रीडा संघटनांची समस्या सोडवण्यात आली आहे आणि यामुळे संघटनांनी खेळाडूंना प्रशिक्षित करण्यावर भर दिला पाहिजे.’’