‘सप्तपदी’ आणि इतर विधींखेरीज हिंदू विवाह वैध नाही ! – अलाहाबाद उच्च न्यायालय (Allahabad High Court)

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ‘सप्तपदी’ आणि इतर विधींखेरीज हिंदु विवाह वैध नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. एका कौटुंबिक प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय कुमार सिंह यांनी हे निरीक्षण नोंदवले. उच्च न्यायालयाने एका प्रकरणाची संपूर्ण प्रक्रिया रहित केली, ज्यात एका पतीने ‘घटस्फोट न घेता त्याच्या पत्नीने पुनर्विवाह केला’, असा आरोप केला होता.

१. याचिकाकर्त्या स्मृती सिंह यांचे वर्ष २०१७ मध्ये सत्यम सिंह यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही काळातच स्मृती यांनी ‘हुंड्यावरून माझा छळ करण्यात आला’, असा आरोप करत पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आणि पतीचे घर सोडले. चौकशीनंतर पोलिसांनी पती आणि सासरच्या लोक यांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट केले.

२. जानेवारी २०२१ मध्ये मिर्झापूर कौटुंबिक न्यायालयाने सत्यम यांना पोटगी म्हणून पत्नीला प्रतिमाह ४ सहस्र रुपये देण्याचा आदेश दिला. ‘पत्नीने दुसरा विवाह करेपर्यंत हे पैसे देण्यात यावेत’, असे न्यायालयाने सांगितले.

३. सत्यम यांनी ‘स्मृती यांनी दुसरा विवाह केला’, असा आरोप करत वाराणसी जिल्हा न्यायालयात धाव घेतली.

४. सप्टेंबर २०२१ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने स्मृती यांना समन्स बजावून न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगितले. या कारवाईच्या विरोधात स्मृती सिंह यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

५. स्मृती सिंह यांच्या याचिकेवर सुनावणी करतांना न्यायमूर्ती संजय कुमार सिंह म्हणाले की, विवाहाच्या संदर्भात ‘समारंभ’ या शब्दाचा अर्थ ‘योग्य समारंभांनी आणि योग्य पद्धतीने विवाह साजरा करणे’ असा होतो. जोपर्यंत विवाह योग्य समारंभ आणि योग्य पद्धतीने साजरा होत नाही किंवा पार पाडला जात नाही, तोपर्यंत तो ‘संपन्न’ झाला असे म्हणता येणार नाही. जर विवाह वैध नसेल, तर कायद्याच्या दृष्टीनेही तो विवाह नाही.

‘सप्तपदीतील सातवे पाऊल उचलल्यानंतर विवाह संपन्न होतो’, असे म्हणत न्यायालयाने पतीच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.