शाकाहारी भोजनाच्या पटलावर मांसाहार करणार्‍या विद्यार्थ्याला १० सहस्र रुपयांचा दंड !

‘आयआयटी मुंबई’च्या भोजनालय समितीची कारवाई !

मुंबई – ‘आयआयटी मुंबई’ (भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई) या शैक्षणिक संस्थेच्या उपाहारगृहात शाकाहारींसाठी राखीव असणार्‍या जागेवर २८ सप्टेंबर या दिवशी काही विद्यार्थ्यांनी मांसाहार केला. भोजनालयात शाकाहारी आणि मांसाहारी अशी विभागणी करण्यात आल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी ही कृती केली. या प्रकरणी भोजनालय समितीने १२ क्रमांकाच्या हॉस्टेलमधील एका विद्यार्थ्याला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे.

१. भोजनालय समितीच्या बैठकीत ४ प्राध्यापकांसह ‘वॉर्डन’ (वसतीगृहातील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि अन्य गोष्टी यांसाठी उत्तरदायी व्यक्ती) आणि ३ विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. यात विद्यार्थ्यांचे चुकीचे वर्तन आणि भोजनालय नियमांचे उल्लंघन यांवर चर्चा करण्यात आली. त्यानुसार ‘रात्रीच्या भोजनाच्या वेळी काही विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक नियमांचे उल्लंखन केले. याचे पुरावे आहेत’, असे समितीने म्हटले आहे.

२. समितीने या प्रकरणी अन्य २ विद्यार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी ३ वसतीगृहांच्या विद्यार्थी प्रतिनिधींचे साहाय्य मागितले आहे. ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.

संपादकीय भूमिका 

शैक्षणिक संस्थेतील नियमांचा भंग करणार्‍यांना अशाच प्रकारे शिक्षा करायला हवी !