नांदेड, संभाजीनगर येथील रुग्‍णांच्‍या मृत्‍यूचा सविस्‍तर अहवाल केंद्र सरकारने मागवला !

रुग्‍णालयांना केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून आवश्‍यक ते साहाय्‍य पुरवले जाणार

छायाचित्र सौजन्य : नवभारत

मुंबई – नांदेडसह छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्‍णालयांत झालेल्‍या रुग्‍णांच्‍या मृत्‍यूंची नोंद केंद्र सरकारने घेतली आहे. रुग्‍णांच्‍या मृत्‍यूविषयी रुग्‍णालय प्रशासनाकडून सविस्‍तर अहवाल मागवण्‍यात आला आहे. त्‍यानंतर कारवाई करण्‍यात येईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री भारती पवार यांनी दिली. यासमवेतच राज्‍यातील शासकीय रुग्‍णालयांना केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून आवश्‍यक ते साहाय्‍य पुरवले जाईल, असे आश्‍वासनही डॉ. भारती पवार यांनी दिले आहे.

प्रसारमाध्‍यमांशी बोलतांना डॉ. भारती पवार म्‍हणाल्‍या, रुग्‍णालयाच्‍या संबंधित अधिकार्‍यांशी माझे बोलणे झाले आहे. त्‍यांच्‍याकडून रुग्‍णांच्‍या मृत्‍यूविषयी खुलासा मागवला आहे. दगावलेल्‍या रुग्‍णांना नेमका कोणता आजार होता ? ते कधी रुग्‍णालयात भरती झाले होते ? ही सर्व माहिती मागवण्‍यात आली आहे. सविस्‍तर अहवाल आल्‍यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्‍णालय यांवर सरकारचे लक्ष !

शासकीय रुग्‍णालयांच्‍या दुरवस्‍थेविषयी डॉ. भारती पवार म्‍हणाल्‍या की, एन्.एम्.सी.च्‍या (नॅशनल मेडिकल कमीशन) मार्गदशक सूचना असून त्‍यांच्‍याकडून सातत्‍याने शासकीय रुग्‍णालयांची पडताळणी होत असते. चुकीच्‍या पद्धतीने वैद्यकीय महाविद्यालय चालत असेल, तर कारवाई केली जाते. जिथे सुविधा नसतील, अशा वैद्यकीय महाविद्यालयाला अनुमती दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्‍यात आला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्‍णालये यांवर सरकारचे लक्ष आहे.