उदयनिधी स्टॅलिन, प्रियांक खर्गे, ए. राजा, निखिल वागळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर ‘हेट स्पीच’चा गुन्हा नोंदवा !

हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याच्या प्रकरणी दादर पोलीस ठाण्यात तक्रार !

तक्रारीसाठी आलेले हिंदुत्वनिष्ठ

मुंबई – सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया, कोरोना, एड्स, कुष्ठरोग आदी रोगांशी करून तो नष्ट करण्याची भाषा करणारे तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन, कर्नाटकचे ग्रामविकासमंत्री प्रियांक खर्गे, तमिळनाडूचे द्रमुकचे खासदार ए. राजा, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, तसेच फेसबूकवरून उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन करणारे पत्रकार निखिल वागळे यांच्या विरोधात ‘हेट स्पीच’ (द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याचा) गुन्हा नोंदवा, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून करण्यात आली. २ ऑक्टोबर या दिवशी हिंदुत्वनिष्ठांनी दादर येथील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ‘सनातन धर्म, म्हणजे देशाला लागलेली कीड आहे’, असे वक्तव्य केले आहे. कोणत्याही धर्माविषयी अशोभनीय, निंदा करणारे, अपमानास्पद वक्तव्य करून धार्मिक भावना दुखावणे हा भा.दं. संहिता कलम १५३ (अ), १५३ (ब), २९५ (अ), २९८, ५०५ आणि आय.टी. कायदा यांतर्गत गुन्हा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणार्‍यांना त्वरित अटक करण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. यावर पोलिसांनी घटनेची निश्‍चिती करून पुढील कार्यवाहीचे आश्‍वासन दिले आले.

सर्वोच्च न्यायालयाकडून सरकारला स्वतःहून गुन्हा नोंदवण्याचे निर्देश !

‘हेट स्पीच’विषयी सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती के.एम्. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी २८ एप्रिल या दिवशी ‘समाजात कुणीही द्वेष पसरवणारे वक्तव्य करून समाजात वाद निर्माण करणार्‍यांच्या विरोधात कुणी तक्रार प्रविष्ट करण्याची वाट न पहाता सरकारने स्वत:च गुन्हा नोंदवावा’, असे निर्देश दिले आहेत. असे करण्यास विलंब झाला, तर हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान मानला जाईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. असे असूनही सनातन धर्माविषयी द्वेषपूर्ण भाषण करणार्‍यांच्या विरोधात अद्यापही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्याचे हिंदुत्वनिष्ठांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

… अन्यथा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याविषयी याचिका प्रविष्ट करणार !

पोलिसांकडून योग्य ती कारवाई झाली नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाल्याविषयी याचिका प्रविष्ट करण्यात येईल, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेले द्वेषपूर्ण वक्तव्य !

चेन्नई येथील कामराज मैदानात भारतीय मुक्ती संग्रामातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान’ या विषयावरील व्यंगचित्रांच्या पुस्तक प्रकाशन समारंभामध्ये उदयनिधी स्टॅलिन यांनी ‘काही गोष्टींना नुसता विरोध करून जमणार नाही, तर त्यांचा समूळ नायनाट केला पाहिजे. डेंग्यूचे डास, मलेरिया, कोरोना, ताप यांसारख्या गोष्टींना केवळ विरोध करून जमत नाही. त्यांना नष्ट केले पाहिजे. त्याप्रमाणे सनातन (धर्म) सुद्धा नष्ट केला गेला पाहिजे.