‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’, घटस्‍फोट यांसारख्‍या गोष्‍टी स्‍वीकारणे कठीण जाते ! – अभिनेते जितेंद्र

अभिनेते जितेंद्र यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमधील क्षण

मुंबई – सद्य:स्‍थितीत ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता मुलामुलीने एकत्र रहाणे), ‘घटस्‍फोट’ या गोष्‍टी सामान्‍य वाटतात. मी लहान असतांना या गोष्‍टींचा विचारही करता येत नव्‍हता. घटस्‍फोट त्‍या काळी केवळ अमेरिकेत व्‍हायचे. आताही मला मानसिकरित्‍या या गोष्‍टी स्‍वीकारणे कठीण जाते, असे वक्‍तव्‍य हिंदी चित्रपटसृष्‍टीतील अभिनेते जितेंद्र यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये केले.  ते म्‍हणाले, ‘‘माझ्‍या काळात ‘लबाड’ शब्‍दही वाईट समजला जायचा. आजकाल तो पुष्‍कळ सामान्‍य वाटतो; पण त्‍याकाळी कुणी लबाड म्‍हटले की, वाईट वाटायचे. तेव्‍हाच्‍या मराठी लोकांमध्‍ये हावरटपणा नव्‍हता. जवळ जे काही होते, ते स्‍वतः मिळवल्‍याचा आनंद होता. मी आताही त्‍या लोकांना शोधत असतो. इतके चांगले मराठी लोक होते. मी गिरगाव येथे शिकलो की, स्‍वतःची पात्रता कधीच विसरायची नाही. स्‍वतःला पुष्‍कळ मोठे समजू लागलात, तर ही तुमची चूक आहे.’’