पनवेल-कळंबोलीजवळ मालगाडी घसरल्‍याने रेल्‍वे सेवा विस्‍कळीत होऊन प्रवासी त्रस्‍त !

  • खोळंबलेल्‍या एक्‍सप्रेसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद

  • स्‍वच्‍छतागृहांत पाणीच नाही

कोकण रेल्‍वे मार्गावरील रुळांवरून घसरलेली मालगाडी

ठाणे, १ ऑक्‍टोबर (वार्ता.) – कोकण रेल्‍वे मार्गावरील पनवेल-कळंबोली या रेल्‍वे स्‍थानकांच्‍या दरम्‍यान ३० सप्‍टेंबरला मालगाडी रुळांवरून घसरल्‍याने या मार्गावरील रेल्‍वे सेवा विस्‍कळीत झाली होती. याचा सर्वाधिक फटका कोकणात जाणार्‍या-येणार्‍या प्रवाशांना बसला आहे. लांब पल्‍ल्‍याच्‍या गाड्या खोळंबल्‍यामुळे गाडीतील आणि रेल्‍वे स्‍थानकांवरील प्रवासी त्रस्‍त झाले होते. कोकणकन्‍या आणि मांडवी एक्‍सप्रेस यांसह अन्‍य काही गाड्या रहित करण्‍यात आल्‍या होत्‍या.

काही एक्‍सप्रेसमधील वातानुकूलित यंत्रणा बंद झाल्‍याने प्रवासी गुदमरले. रेल्‍वे स्‍थानकांवरील प्रतीक्षालये प्रवाशांनी भरलेली होती. प्रवाशांच्‍या तक्रारी सोडवण्‍यासाठी रेल्‍वे तिकीट तपासनीस किंवा अन्‍य सेवक कुणीही फिरकत नव्‍हते. एक्‍सप्रेसमधील स्‍वच्‍छतागृहांत पाणी नसल्‍याने प्रवाशांची गैरसोय झाली.

दिवा येथे कोकणाच्‍या दिशेने जाणार्‍या प्रवाशांचे रेल्‍वेबंद आंदोलन, मध्‍य रेल्‍वेची वाहतूक ठप्‍प !

ठाणे – वसईच्‍या दिशेने आलेल्‍या, तसेच मुंबईकडून पनवेलमार्गे कोकणात जाणार्‍या लांब पल्‍ल्‍याच्‍या एक्‍सप्रेस गाड्या अपघातामुळे दिवा रेल्‍वेस्‍थानक परिसरात काही घंट्यांपासून खोळंबल्‍या होत्‍या. त्‍यामुळे गाड्यांमधील प्रवासी रेल्‍वे रुळांवर उतरले होते. संतप्‍त प्रवाशांनी सकाळी ९ वाजता ‘रेल्‍वेबंद’ आंदोलन केले. पोलिसांनी सकाळी १० वाजता प्रवाशांना बाजूला केल्‍यानंतर वाहतूक चालू झाली.

संपादकीय भूमिका

लांब पल्‍ल्‍याच्‍या गाड्यांमधील प्रवाशांची गैरसोय टाळण्‍यासाठी प्रयत्न न करणारे निष्‍क्रीय रेल्‍वे प्रशासन !