आपण तेजाचे उपासक आहोत कि केवळ एखाद्या दरीत रहाणारे आहोत ?

‘इंडिया’ (India) कि ‘भारत’ या वादावर वस्‍तूनिष्‍ठता मांडणारा लेख

देशाचे नाव ‘इंडिया’ (India) कि ‘भारत’ (Bharat) यांपैकी काय हवे ? यावरून चालू झालेली चर्चा आणि चिघळत असणार्‍या वादाच्‍या पार्श्‍वभूमीवर काही गोष्‍टींचा ऊहापोह होणे आवश्‍यक आहे. मुळात या देशाचे नाव ‘आर्यावर्त’ असे होते. पुढच्‍या काळात सीमांचा संकोच, परकियांची आक्रमणे होत गेली, तसतशी नावेही पालटत गेली. ‘प्राचीन काळातील एका कथेनुसार ‘भरत’ राजाच्‍या नावावरून या देशाचे नाव ‘भारत’ झाल्‍याचे मानले जाते’, असे म्‍हणतात. एक तर्क असाही दिला जातो की, ‘भा’ म्‍हणजे तेज… हे तेज ज्ञानाचे, ज्ञानयुक्‍त…! याचे पूजन करण्‍यामध्‍ये कार्यरत असणारे लोक म्‍हणजे भारतीय आणि ते रहातात, त्‍या भूमीला ‘भारत’ ही संज्ञा प्राप्‍त झाली. थोडक्‍यात ‘तेजाचे पूजन करणारा देश’ अशी ओळख अधोरेखित करणारे विपुल प्राचीन वाङ्‍मय पहाता ही पटणारी गोष्‍ट आहे. ‘इंडस व्‍हॅली’मध्‍ये (सिंधू खोरे) असल्‍यामुळे पुढच्‍या काळात त्‍याला ‘इंडिया’ हे नाव प्राप्‍त झाल्‍याचे म्‍हटले जाते. तरीही हे परकियांनी दिलेले नाव असल्‍याचे सत्‍य शिल्लक रहातेच.

स्‍वराज्‍य मिळाल्‍यानंतर सर्वच गोष्‍टी तातडीने पालटता येत नाहीत, हे सत्‍य आपण कधीतरी मान्‍य करायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही राज्‍यघटनेमध्‍ये ‘इंडिया दॅट इज भारत’ (इंडिया म्‍हणजेच भारत) असाच उल्लेख करून दोन्‍ही नावांमध्‍ये एक प्रकारचा समन्‍वय साधला आहे. एखाद्या देशाची दोन-दोन नावे असणे, हे जगामध्‍ये क्‍वचितच घडले आहे, उदा. डॉइश लँड (जर्मनी), निपॉन (जपान), तसेच इंडिया (भारत) ! यात एकच भाग असा की, भारतीयच स्‍वत:ला ‘इंडियन’ समजू लागले आहेत. याव्‍यतिरिक्‍त राजकारणी लोकही बोलतांना ‘इंडिया’ आणि ‘भारत’ असे दोन वर्ग इथे रहात असल्‍याचे सांगू लागले आहेत. यामागे राजकारण असणार हे नक्‍की; पण सामान्‍य माणूस यामुळे गोंधळून जातो, हेही खरेच आहे.

‘इंडिया’ नव्‍हे, ‘भारत’ म्‍हणा !

१. ‘इंडिया’ या नावातून नेमका कोणता गौरवास्‍पद अर्थ निघतो ?

डॉ. सच्चिदानंद शेवडे

देशाचे नाव पालटायचे असेल, तर ‘इंडिया’ (India) किंवा ‘भारत’ (Bharat) यात ‘इंडिया’ हे नाव येत असणार्‍या सर्वच आस्‍थापनांची नावे हळूहळू का होईना, पालटावी लागतील. स्‍वत: पंतप्रधानांनी ‘इंडिया’ या नावाचा समावेश असणार्‍या अनेक योजना चालू केल्‍या असून त्‍याचे वारंवार उच्‍चारणही केले आहे. अशा वेळी नावाचा पालट वाटतो तितका सोपा नसतो, हेही लक्षात घ्‍यायला हवे; परंतु ‘आजवर स्‍वातंत्र्य मिळून ७६ वर्षे उलटून गेल्‍यानंतरही ‘या खंडप्राय देशाचे एकच नाव असावे’, असा विचार कुणाच्‍याही मनात का येऊ नये ?’, याचे आश्‍चर्य वाटते. ‘नावात काय आहे ?’, असे शेक्‍सपिअर म्‍हणाला होता म्‍हणे; पण आपल्‍या देशात अर्थवाही (अर्थपूर्ण) नावे ठेवण्‍याची पद्धत आहे. स्‍थानांची, मुलांची, इतकेच नव्‍हे, तर आपण सोडतो, ती अंतराळ याने वा बनवली जाणारी शस्‍त्रे आदींची नावेही अर्थवाहीच असतात, हे लक्षात घ्‍यायला हवे. असे असतांना ‘इंडिया’ या नावातून नेमका कोणता गौरवास्‍पद अर्थ प्रतीत होतो, हे कुणी सांगावे ? ‘भारत’ या शब्‍दाचा अर्थ मात्र वर सांगितल्‍यानुसार गौरवास्‍पदच आहे. त्‍यामुळे ‘या दोन्‍हींमध्‍ये कलह उत्‍पन्‍न करण्‍याचा होणारा प्रयत्न राष्‍ट्राच्‍या प्रकृतीला मानवणारा ठरील’, असे वाटत नाही.

२. विरोधाला विरोध करण्‍यापेक्षा विचारांती पालट करणे आवश्‍यक !

दुसरे म्‍हणजे विरोधकांचा एक मोठा वर्ग पंतप्रधानांनी एखादी गोष्‍ट मांडली असता ती समजून न घेता एकाएकी विरोध करण्‍यास प्रवृत्त होणारा आहे. ‘विरोधासाठी विरोध ही प्रवृत्ती लोकशाहीसाठी धोकादायक आहे’, असे वाटत नाही का ? कोणतीही गोष्‍ट एकदम रुजणे वा रुजवणे नक्‍कीच कठीण असते; पण अशक्‍य नसते. त्‍यामुळे अशा प्रकारचा वाद निर्माण करून त्‍यातून सर्वसामान्‍यांच्‍या मनात शंका-कुशंका निर्माण करण्‍यापेक्षा विरोधकांनीही पुढे येऊन आपल्‍या सूचना मांडल्‍या असत्‍या, तर अधिक उचित ठरले असते. देशाचे नाव पालटल्‍यामुळे आपली विदेशात असणारी ओळख पालटणे कुणाला कठीण वाटत असले, तरी ते अशक्‍य मुळीच नाही. त्‍यामुळे काही काळ तरी या दोन्‍ही नावांचा उल्लेख समांतर होत जाणार, हेही नक्‍की ! मात्र हे सगळे असले, तरी यात सगळ्‍यात मोठा भाग असा की, देशाचे नाव पालटण्‍याचा घाट अधिकृतपणे विद्यमान सरकारने घातल्‍याचे कुठेही घोषित झालेले नाही. ‘ते होत नाही, तोपर्यंत या सगळ्‍या वरवरच्‍या गोष्‍टी आहेत’, असेच म्‍हटले जाईल. म्‍हणूनच लगेच याला विरोध करणे वा खंबीर पाठिंबा देणे, या दोन्‍ही गोष्‍टींपेक्षा ‘थांबा, वाचा, विचार करा आणि मग पुढे जा’, हे टप्‍पे सर्वांनीच लक्षात ठेवायला हवेत.

३. नावाला विरोध करणार्‍यांची भूमिका पलायनवादी !

काही विरोधकांचा आरोप असा की, त्‍यांच्‍या आघाडीचे नाव ‘इंडिया’ असल्‍यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही चाल खेळली आहे. राजकारणाचा विचार करता समजा तसे असले, तरी त्‍यात चूक काय आहे ? कारण राजकारणाला युद्ध मानले, तर यात शह-काटशह होत असतातच. याला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी पलायनवादी भूमिका न घेता विरोधकांनी योग्‍य तर्कानिशी पुढे येणे आवश्‍यक आहे. दुसरीकडे विरोधकांच्‍या आघाडीतही ‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही दोन्‍ही नावे वापरात येत आहेत. अलीकडे काँग्रेसने ‘भारत जोडो’ यात्रा काढलीच होती. त्‍यात ‘इंडिया’ आणि ‘भारत’ हे दोन्‍ही शब्‍द आहेत. त्‍यामुळे त्‍यांनी अस्‍वस्‍थ होण्‍याचे काहीच कारण नाही; पण राजा, उंदीर आणि टोपी या गोष्‍टीतील घटनेनुसार विरोधकांची सर्व आक्रमणे चालूच आहेत. तसे बघायला गेले, तर या दोन्‍ही नावांमुळे पुष्‍कळ मोठी सुधारणा होईल अथवा काही बिघडणार नाही. तथापि एखाद्या राष्‍ट्राला स्‍वाधीनतेनंतर त्‍याची अस्‍मिता आणि स्‍वाभिमान या दोन्‍ही गोष्‍टी मूळ नावामधूनच प्राप्‍त होत असतात. त्‍यामुळे क्षणभर ‘हा सगळा निवडणुकीसाठीचा ‘स्‍टंट’ (काल्‍पनिक खेळ) आहे’, असे मानले, तरी त्‍यात चुकीचे काहीच नाही. प्रत्‍येक पक्ष निवडणुकीसाठी स्‍वत:ची अशी काही सूत्रे मांडत असतोच. त्‍यात सत्ताधार्‍यांकडून एका सूत्राची भर पडली इतकेच. यावर ‘रडाचे कढ काढण्‍या’पेक्षा सशक्‍त सूत्र घेऊन मोदी विरोधकांनी पुढे येण्‍याची आवश्‍यकता आहे.

४. ‘इंडिया’चे नाव ‘भारत’ झाले, तर त्‍यात वावगे काय ?

कायद्यानुसार बघता राज्‍यघटनेच्‍या प्रस्‍तावनेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्‍द समाविष्‍ट करून इंदिरा गांधी यांनी एक पायंडा पाडला. त्‍याच पायंड्यानुसार विद्यमान सरकार त्‍या प्रस्‍तावनेत देशाच्‍या नावाविषयीचा पालट सहज करू शकते. आपल्‍या राष्‍ट्रगीतातही ‘भारत भाग्‍यविधाता’ असे म्‍हटले आहे. शाळेत लहानपणापासून शिकलेल्‍या प्रतिज्ञेतही ‘भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत’, हेच आपण शिकत आलो आहोत. अशा वेळी ‘इंडिया’चा ‘भारत’ झाला, तर कुणालाही त्‍यात वावगे का वाटावे ? इतर ठिकाणची नावे पालटणे, हा केवळ उपचार असून सत्ताधारी योग्‍य रितीने निपटवू शकतात. यात देशाचे नाव आताच का पालटले ? हीच वेळ का निवडली ? आधी लक्षात का आले नाही ? अशा मुद्यांना काहीच अर्थ उरत नसतो, म्‍हणजेच मी एखादी चूक जन्‍मभर करत आलो आणि दुसर्‍याने ती दाखवून दिली, तर ती तो आताच का दाखवतो आहे ? असा प्रतिप्रश्‍न करण्‍यासारखे झाले.

५. विदेशात गौरवाने उन्‍नत होण्‍यासाठी कोणते नाव योग्‍य ? हे ठरवणे महत्त्वाचे !

खरे तर आपल्‍याकडे धर्माच्‍या नावातही असाच वाद घातला जातो; कारण एकच की, धर्माला नाव नसते. त्‍याला विशेषणे असतात. त्‍यामुळेच आर्य, सनातन, वैदिक हिंदु धर्म असे कुणी म्‍हणतो, तेव्‍हा आधीची ४ ही त्‍याची विशेषणे आहेत, हे सांगावे लागते. नावातूनच अर्थ प्रतीत होत असतो. जसे की, आर्य म्‍हणजे सुसंस्‍कृत ! वैदिक म्‍हणजेच वेद हे आपले मूळ असल्‍याची मान्‍यता ! सनातन म्‍हणजे नित्‍यनूतन, म्‍हणजेच कधी निर्माण झाले, ते माहिती नाही आणि कधीही नष्‍ट होणार नाही असे ! हिंदु हे तुलनेने अलीकडच्‍या काळात आलेले नाव. म्‍हणजेच नावातून एखादी गोष्‍ट प्रतीत होत असेल, तर ‘इंडिया’ हा शब्‍द योग्‍य कि ‘भारत’ हा शब्‍द ? हा सारासार विचार करून आपण ठरवायला हवे की, आपण तेजाचे उपासक आहोत कि केवळ एखाद्या दरीत रहाणारे आहोत ? देशाची मान विदेशात गौरवाने उन्‍नत होण्‍यासाठी यातील कोणते नाव योग्‍य आहे ? याचाही विचार होणे आवश्‍यक आहे. त्‍यातून ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ । (संपूर्ण पृथ्‍वी हेच कुटुंब आहे) आणि ‘सर्वेऽत्र सुखिनः सन्‍तु ।’ (सर्व प्राणीमात्र सुखी होवोत) ही आपली मूलभूत तत्त्वे आपण विदेशी लोकांसमोरही उत्तमरित्‍या प्रसारित आणि प्रचारित करू शकतो.

थोडक्‍यात भारताचे सुबुद्ध नागरिक म्‍हणून आपल्‍यापैकी प्रत्‍येकाने देशाचे प्राचीन परंपरा सांगणारे नाव योग्‍य कि तुलनेने अलीकडच्‍या काळात आलेले विदेशी भाषेतील नाव योग्‍य ? याचा आपापल्‍या परीने अभ्‍यासपूर्वक विचार करावा.

– डॉ. सच्‍चिदानंद शेवडे, हिंदुत्‍वनिष्‍ठ व्‍याख्‍याते आणि लेखक, डोंबिवली. (१०.९.२०२३)

(डॉ. सच्‍चिदानंद शेवडे यांच्‍या ‘फेसबुक’वरून साभार)

विदेशात देशाचा गौरव होईल, यासाठी ‘भारत’ कि ‘इंडिया’ यातील कोणते नाव योग्‍य ठरेल, याचा विचार व्‍हायला हवा !