भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी आय.एस्.आय.ने हाती घेतली ‘के’ (खलिस्तान) नावाची आंतरराष्ट्रीय मोहीम !

  • भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधांचा अपलाभ घेण्याचा प्रयत्न !

  • ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका या देशांत पाकचे ‘एजंट’ सक्रीय !

नवी देहली – आतंकवादी हरदीपसिंह निज्जर याच्या हत्येवरून भारत आणि कॅनडा या देशांमध्ये वाढलेल्या तणावाचा पाकची गुप्तचर संघटना आय.एस्.आय. अपलाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहे. आय.एस्.आय.ने भारतातील शीखबहुल भागांत, तसेच इतर देशांत भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्याला ‘के’ असे नाव देण्यात आले आहे. ‘के’ म्हणजेच खलिस्तान !

१. या कटाचा एक भाग म्हणून आय.एस्.आय.ने कॅनडा, ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका या देशांतील शीखबहुल भागांत त्यांचे ‘एजंट’ सक्रीय केले आहेत. त्यांच्या माध्यमातून ‘शीख फॉर जस्टिस’ या आतंकवादी संघटनेला, तसेच भारताविरुद्ध वातावरण निर्माण करण्यासाठी अन्य खलिस्तानी आतंकवाद्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी दिला जात आहे. यासह विविध देशांतील भारतीय दूतावासांवर आक्रमण आणि निदर्शने करण्यासाठी आतंकवाद्यांना चिथावणी दिली जात आहे.

२. आय.एस्.आय. भारतीय दूतावासात काम करणार्‍या वरील देशांतील राजनैतिक अधिकार्‍यांची छायाचित्रे त्यांच्या वैयक्तिक माहितीसह आतंकवाद्यांपर्यंत पोचवत आहेत. या अधिकार्‍यांच्या कुटुंबात किती सदस्य आहेत ? त्यांची मुले कुठे शिकतात ? पत्नी काय करते ? इत्यादी माहिती खलिस्तानी आतंकवाद्यांना पाठवण्यात येत आहे. या माहितीचा वापर करून आतंकवादी त्यांना लक्ष्य करू शकणार आहेत.

संपादकीय भूमिका

भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी पाककडून असे प्रयत्न केले जाणे, यात कोणतेच आश्‍चर्य नाही. खरेतर अशा प्रकारे कार्य करून पाक त्याचाच नाश ओढावून घेत आहे. यापेक्षा त्याने बलुचिस्तान, सिंध आदी प्रांतांतील लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष द्यावे. अन्यथा निकटच्या भविष्यात त्याला त्याच्या अर्ध्याअधिक भूमीवरच तुळशीपत्र ठेवावे लागेल !