(म्हणे) ‘खलिस्तानी नेत्याच्या हत्येचे प्रकरण गांभीर्याने घ्यावे !’-जस्टिन ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे भारताला आवाहन !

जस्टिन ट्रुडो आणि आतंकवादी निज्जर

न्यूयॉर्क (अमेरिका) – कॅनडाच्या संसदेत निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारतावर करण्यात आलेल्या आरोपांविषयी माहिती देण्याचा निर्णय सहजासहजी घेण्यात आलेला नाही. हत्येच्या प्रकरणातील आरोप विश्‍वासार्ह असून ते अत्यंत गांभीर्याने घेतले पाहिजेत. त्याला न्याय मिळावा, यासाठी भारतानेही कॅनडासमवेत काम करावे, असे फुकाचे आवाहन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केले आहे. ‘हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे’, असे आवाहन आम्ही भारत सरकारला करत आहोत. या प्रकरणात संपूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी, तसेच दायित्व आणि न्यायाची हमी देण्यासाठी भारताने आमच्याबरोबर काम करावे’, असेही ट्रुडो म्हणाले.

‘भारताने कॅनडाच्या नागरिकांसाठी व्हिसा सेवा तात्पुरत्या स्वरूपात थांबवल्यामुळे  कॅनडा सरकार त्यावर उपाययोजना करणार आहे का ?’, असे विचारले असता ट्रुडो म्हणाले की, आमच्या देशात कायद्याचे राज्य आहे. आम्ही आमच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि आमची आंतरराष्ट्रीय मूल्ये जपण्यासाठी आवश्यक ते सर्व काम करत रहाणार आहोत. सध्यातरी आमचे लक्ष्य हेच आहे.

आम्हालाही भारतासमवेत यापुढेही काम करायचे आहे !

ट्रुडो पुढे थोडीशी माघार घेत म्हणाले की, भारताचे महत्त्व वाढत आहे, यात शंकाच नाही. आम्हालाही भारतासमवेत यापुढेही काम करायचे आहे, यातही काहीच शंका नाही; पण आम्ही कोणत्याही प्रकारे भारताला भडकावण्याचा किंवा समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत. कायद्याचे महत्त्व आणि कॅनडाच्या नागरिकांची सुरक्षा याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच आम्ही भारत सरकारला या प्रकरणी सत्यापर्यंत पोचण्यासाठी आमच्यासमवेत काम करण्याची विनंती केली आहे. आम्ही कायद्याला महत्त्व देणारे राष्ट्र आहोत. कॅनडाच्या नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जे  शक्य आहे, ते आम्ही करत रहाणार.

संपादकीय भूमिका

हत्या कॅनडात झाली आहे. याला ३ मास होत आले असतांना अद्याप कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. याचा अर्थ कॅनडा याविषयी गंभीर नाही किंवा तेथील पोलिसांची क्षमता नाही, असेच लक्षात येते ! अशा वेळी कॅनडाने स्वतःकडे पहाण्याऐवजी भारताला आवाहन करणे हास्यास्पदच आहे !