श्री तुळजाभवानीदेवीचे पुरातन दागिने गहाळ झाल्‍याच्‍या प्रकरणी खुलासा सादर करण्‍याचा जिल्‍हाधिकार्‍यांचा आदेश !

धाराशिव – महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी श्री तुळजाभवानीदेवीच्‍या खजिन्‍यातील पुरातन दागिने मोजण्‍याच्‍या प्रकरणी येत्‍या सप्‍ताहात अंतिम अहवाल येण्‍याची शक्‍यता आहे. श्री तुळजाभवानीदेवीचे पुरातन दागिने गहाळ झाल्‍याच्‍या प्रकरणी एका महंतांसह तत्‍कालीन धार्मिक व्‍यवस्‍थापक आणि अन्‍य मानकरी यांना अंतिम खुलासा सादर करण्‍याचा आदेश देण्‍यात आला आहे. दागिने मोजण्‍याची प्रक्रिया पूर्ण झाली असून काही दागिने गहाळ झाल्‍याचे आढळले आहे. या कालावधीत ज्‍यांच्‍याकडे खजिन्‍याचे दायित्‍व होते, त्‍यांना खुलासा करण्‍याची अंतिम संधी दिली आहे. ‘त्‍यांचे म्‍हणणे ऐकून घेऊन त्‍यानंतर निर्णय घेतला जाईल’, असे जिल्‍हाधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे यांनी सांगितले.

देवीच्‍या खजिन्‍यातील सोन्‍याचे दागिने आणि चांदीच्‍या वस्‍तू गहाळ !

श्री तुळजाभवानीदेवीच्‍या खजिन्‍यातील सोन्‍याचे दागिने आणि चांदीच्‍या वस्‍तू गहाळ झाल्‍या आहेत, तर काही दागिन्‍यांचे वजन वाढले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍यासह अनेक राजघराण्‍यांनी देवीला अर्पण केलेली नाणी गहाळ झाल्‍याच्‍या प्रकरणी यापूर्वीच तत्‍कालीन व्‍यवस्‍थापकांविरुद्ध गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून त्‍यांतील एकही नाणे अद्याप पोलिसांना अन्‍वेषणामध्‍ये सापडलेले नाही. हे प्रकरण सध्‍या न्‍यायप्रविष्‍ट आहे.