राजस्थानच्या काँग्रेस सरकारचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा यांचा शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश

राजस्थानचे आमदार राजेंद्र गुढा यांचा शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश

जयपूर/उदयपुर (राजस्थान) – राजस्थानमधील काँग्रेस सरकारमध्ये मंत्री असतांना सरकारच्याच विरोधात भ्रष्टाचारावरून मोर्चा काढल्यामुळे मंत्रीपदावरून हटवण्यात आलेले आमदार राजेंद्र गुढा यांनी शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुढा यांनी त्यांच्या मूळ गावी पक्षात प्रवेश केला. या वेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर टीका करतांना म्हटले, ‘वर्षभरापूर्वी गेहलोत म्हणाले होते, ‘गुढा यांच्यामुळे मी मुख्यमंत्री आहे.’ आता गेहलोत यांनी गुढा यांना बडतर्फ केले. गेहलोत यांनी जे केले त्याचे उत्तर जनता देईल.’

 (सौजन्य : Sach Bedhadak)

राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत लाल डायरी दाखवली होती आणि, ‘ही डायरी राजस्थान पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष धर्मेंद्रसिंह राठोड यांच्या घरावर आयकर छाप्यापूर्वी आणली होती’, असा दावा केला होता. त्या दिवशी मोठा गदारोळ झाला होता. लाल डायरीविषयी गुढा यांनी गेहलोत सरकारच्या विरोधात सातत्याने आघाडी उघडली आहे. गुढा यांनी लाल डायरीची ३ पानेही प्रसिद्ध केली होती, ज्यात राजस्थान क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. भाजपने सातत्याने लाल डायरी हे निवडणुकीचे सूत्र बनवले आहे. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या सभांमध्ये अमित शहांपासून पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्याने लाल डायरीच्या सूत्रावरून गेहलोत सरकारवर टीका केली होती.