आज समयमर्यादेनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्‍यास सलाईन काढणार !

आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांची सरकारला चेतावणी !

आंदोलनकर्ते मनोज जरांगे

जालना – जिल्‍ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्‍या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत. ८ सप्‍टेंबर या दिवशी त्‍यांच्‍या उपोषणाचा ११ वा दिवस होता. मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावे, अशा विनंतीचे पत्रही सरकारने दिले आहे; पण त्‍यांनी हा प्रस्‍ताव फेटाळला आहे. जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागण्‍यांच्‍या संदर्भात सरकारचा अद्याप निरोप आलेला नाही. उद्या माझ्‍या समयमर्यादेनुसार शेवटचा दिवस आहे. ९ सप्‍टेंबरपर्यंत निरोप न आल्‍यास मला लावलेली सलाईन काढून पाणी बंद करणार आहे, अशी चेतावणी त्‍यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.

मनोज जरांगे म्‍हणाले की, सरकारसाठी आम्‍ही एक पाऊल मागे आलो. रात्रीच निरोप येणार होता; मात्र अजून सरकारचा निरोप आला नाही. आज आम्‍ही सरकारच्‍या निरोपाची वाट पहात आहे. सरकारचा निरोप येईपर्यंत नाव घोषित करणार नाही. तज्ञ, अधिवक्‍ता आणि शेतकरी असे २० आणि २१ लोक शिष्‍टमंडळात असतील. आमच्‍याकडूनही चर्चेची दारे खुली आहेत. उद्या दिवसभर मी सरकारची वाट पाहीन. सरकारसाठीच मी सलाईन घेतले आहे. ९ सप्‍टेंबर हा शेवटचा दिवस आहे. यानंतर हे सर्व बंद करणार आहे. मी माझ्‍या निर्णयावर ठाम आहे. सरकारने कुणबी-मराठा किंवा मराठा-कुणबी अशा नोंदी असलेल्‍या मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्‍याविषयीचा अध्‍यादेश काढला. त्‍यातील ‘वंशावळी’ शब्‍दाला जरांगे यांनी आक्षेप घेतला आहे.