‘आमचा (चि. अतुल बधाले आणि चि.सौ.कां. पूजा नलावडे यांचा) विवाह ठरल्यानंतर वैवाहिक जीवनात आमची साधना होण्यासाठी आम्ही श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचे मार्गदर्शन घेतले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला झालेले लाभ पुढे दिले आहेत.
१. कुटुंबातील सर्वांकडे ‘साधक’ या भावाने पाहिल्यामुळे सहजतेने रहाता येणे आणि त्यांच्याकडून शिकता येणे
विवाह झाल्यानंतर मुलींना नवीन घरी जावे लागते. तेव्हा त्यांच्यासाठी सर्वच नवीन असते. त्यामुळे मुलींना काही वेळा ताण येतो. याविषयी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मला सांगितले, ‘‘विवाह निश्चित करण्यासाठी जातांना किंवा अन्य ठिकाणी गेल्यावर कोणत्याही प्रकारे ताण घेऊ नका. समोरच्या कुटुंबातील सर्व जण साधक आहेत. आपण साधकांशी जसे बोलतो, त्याचप्रमाणे समोरच्या कुटुंबातील व्यक्तींशी बोलावे.’’ त्यांनी सांगितल्यानुसार मी कुटुंबातील सर्वांकडे ‘साधक’ या भावाने पाहिल्यामुळे मला सहजतेने रहाता आले. कुटुंबातील सर्व जण साधक असल्यामुळे मला प्रत्येकाकडून शिकता आले.
२. ‘विवाहाचा आध्यात्मिक स्तरावर कसा लाभ करून घेऊ शकते ?’, असा विचार ठेवून वागल्यामुळे भगवंताने माझ्याकडून ‘स्वतःच्या मतावर ठाम न रहाता इतरांच्या मताचा आदर करणे, न्यूनता घेणे, विचारून कृती करणे, इतरांना समजून घेणे, प्रेमाने वागणे’, असे प्रयत्न करून घेतले.
३. इतरांना समजून घेणे
मी विचार केला, ‘प्रत्येक व्यक्तीमध्ये गुण आणि स्वभावदोष असतात. माझ्याकडून अनेक चुका होऊनही देवाने मला जवळ ठेवले आहे.’ त्यामुळे काही प्रसंग झाल्यास माझ्या मनात कुणाविषयी प्रतिक्रिया न येता मला कुटुंबियांना समजून घेता येते.
४. ‘घरातील सर्व जण गुरुदेवांचे प्रिय साधक आहेत’, असा भाव ठेवल्यामुळे मला सर्वांविषयी मनातून आपोआप प्रेम वाटू लागले.
५. मनमोकळेपणाने बोलण्याचा झालेला लाभ
माझ्यामध्ये ‘मनमोकळेपणाने न बोलणे’, हा स्वभावदोष आहे. एखादा प्रसंग घडल्यास मला समोरच्या व्यक्तीला मनातील विचार सांगता येत नसत. या संदर्भात १ – २ प्रसंग घडले. आरंभी मी याकडे केवळ एक प्रसंग म्हणून पाहिले; मात्र नंतर ‘या प्रसंगांत माझे काय चुकले ? मी कसे असायला हवे होते ?’, याचे चिंतन केल्यावर मला माझ्यामधील स्वभावदोषाची जाणीव झाली. त्यानंतर मी मनमोकळेपणाने बोलणे चालू केले आणि त्याचा लाभ मला सेवा करतांनाही झाला.
६. स्वीकारण्याच्या वृत्तीत वाढ होणे
अ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी ‘विवाहानंतर साधना होण्याला प्राधान्य द्यायचे’, असे सांगितले. त्यामुळे मला काही प्रसंगांत स्थिर रहाता आले किंवा माझ्या मनाचा किंचितही संघर्ष झाला नाही.
आ. माझ्या मनाविरुद्ध काही प्रसंग झाल्यास पूर्वी मी बहिर्मुख व्हायचे; मात्र आता ‘माझे काय चुकले ? या प्रसंगात देवाला मी कसे वागणे अपेक्षित आहे ?’, असा विचार होऊन मला परिस्थिती स्वीकारता येऊ लागली.
७. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी मार्गदर्शन केल्यावर त्यांचा संकल्प कार्यरत झाला असल्याने साधनेचे प्रयत्न होत आहेत’, असे वाटणे
आमच्या विवाहानंतर एक संत यजमानांना अनेक वेळा गमतीने विचारायचे, ‘‘तुमच्यात भांडणे होत नाहीत का ? तुम्ही भांडायचा मुहूर्त कधी काढणार आहात ?’’ आरंभी मी हे गमतीत घेतले; पण नंतर माझ्या लक्षात आले, ‘आम्ही साधनेत नसतो, तर कदाचित् आमच्यात भांडण होऊ शकले असते. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी आम्हाला ‘विवाहानंतर कसे प्रयत्न करायचे ?’, याचे मार्गदर्शन आधीच केल्यामुळे त्यांचा संकल्प त्या माध्यमातून कार्यरत होऊन त्यानुसार देव आमच्याकडून प्रयत्न करून घेत आहे.’
८. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीतील चैतन्याची आलेली प्रचीती !
ही सूत्रे लिहितांना माझ्या मनात विचार आले, ‘माझा तर आताच विवाह झाला आहे. आरंभी सर्वच चांगले वाटते. मी असेच प्रयत्न माझ्या विवाहाला ४ – ५ वर्षे झाल्यानंतरही चालू ठेवले, तर त्याला अर्थ आहे.’ त्यामुळे माझ्या नेमके लक्षात येत नव्हते की, ‘मी हे प्रयत्न केले आहेत कि वैवाहिक जीवनाच्या नाविन्यामुळे आपसूक हे घडलेले आहे ?’ नंतर देवाने माझ्या लक्षात आणून दिले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी साधनेच्या स्तरावर रहायचे’, असे वारंवार सांगितल्यामुळे माझ्या मनावर त्याचा संस्कार झाला आणि माझ्याकडून तसे प्रयत्न झाले. त्यांनी याविषयी मार्गदर्शन केले नसते, तर आता प्रसंग घडत असतांना ज्या गोष्टी माझ्या लक्षात येतात, त्या कदाचित् विलंबाने लक्षात आल्या असत्या.’
९. प्रार्थना
‘हे गुरुमाऊली, तुम्हीच मला नेहमीच साधनेच्या स्तरावर रहायला शिकवा. प्रत्येक प्रसंगात तुम्हाला जसे अपेक्षित आहे, तसे प्रयत्न तुम्ही माझ्याकडून करून घ्या. मला ईश्वरप्राप्तीच्या ध्येयाची सतत जाणीव असू दे. कितीही कठीण परिस्थिती आली, तरीही मला तुमच्या चरणांपाशी ठेवा’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे !’
– सौ. आनंदी अतुल बधाले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (४.४.२०२३)