नूंह (हरियाणा) येथे यात्रा न काढताच विहिंपच्या नेत्यांनी मंदिरात जाऊन केला जलाभिषेक !

जलाभिषेक करताना विहिंपचे काही नेते आणि कार्यकर्ते

नूंह (हरियाणा) – विश्‍व हिंदु परिषदेने येथे २८ ऑगस्ट या दिवशी बृजमंडल जलाभिषेक यात्रा काढण्याचे घोषित केल्यानंतर पोलिसांनी तिला अनुमती नाकारली होती. तरीही विहिंपकडून यात्रा काढण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात येथे यात्रा न काढता भाविकांकडून नल्हड मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्यात आला. तसेच विहिंपच्या काही नेते आणि कार्यकर्ते यांनी मंदिरात जाऊन जलाभिषेक करण्याची अनुमती देण्यात आली होती. या वेळी पोलिसांकडून भाविकांचे ओळखपत्र तपासण्यात येत होते. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण नूंह जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी यात्रेच्या अनुषंगाने भाजपचे नेते मोतीराम शर्मा यांना कह्यात घेतले होते. शर्मा या यात्रेच्या आयोजन समितीचे सदस्य होते.

विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष आलोक कुमार, स्वामी धर्मदेव आदींनी नल्हड मंदिरात जाऊन जलाभिषेक केला. या मंदिरात श्रावणी सोमवारी जलाभिषेकासाठी मोठ्या संख्येने भाविक येत असतात.

घरातच रहा, बाहेर पडू नका ! – मुसलमानांना त्यांच्या नेत्यांनी केले होते आवाहन !

२८ या दिवशी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर कुणीही घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन मुसलमानांच्या धार्मिक नेत्यांनी मशिदीतून केले होते. यामुळे बहुतांश मुसलमानांनी त्यांची दुकाने बंद ठेवली होती.
दुसरीकडे हिंदु दुकानदारांनीही त्यांची दुकाने बंद ठेवली होती. मुसलमानबहुल गावात हिंदूंनाही घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले होते.

नूंह येथील हिंसाचारावरून हरियाणाच्या विधानसभेत गदारोळ !

नूंह येथे ३१ जुलै या दिवशी बृजमंडल जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुसलमानांकडून झालेल्या आक्रमणानंतर उसळलेल्या दंगलीच्या प्रकरणी हरियाणाच्या विधानसभेत विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली. यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज ३० मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले होते. काँग्रेसने या वेळी या हिंसाचाराची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांकडून करण्याची मागणी केली.