गणेशोत्सव समन्वय समितीची मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार !
मुंबई – परळ येथील मूर्तीशाळेतून देण्यात येणार्या श्री गणेशमूर्तींच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. याविषयी स्थानिक भोईवाडा पोलीस ठाण्यात कळवूनही गर्दीचे व्यवस्थापन करण्याऐवजी पोलीस भाविकांवर सौम्य लाठीमार करतात, अशी तक्रार गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली. समितीने पोलिसांच्या या कृतीविषयी असंतोष व्यक्त केला असून या प्रकरणी पोलीस आयुक्तांनी लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
लालबाग-परळ परिसरामध्ये अनेक मूर्तीशाळा आहेत. गणेशोत्सवाला काही दिवसच शेष राहिल्यामुळे शेवटच्या कालावधीत गर्दी होऊ नये, यासाठी अनेक सार्वजनिक मंडळे आतापासूनच श्री गणेशाच्या मूर्ती घेऊन जात आहेत. या मूर्ती नेण्यासाठी सार्वजनिक मंडळांतील उत्साही युवकांची गर्दी असते. मागील काही दिवसांपासून काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी समन्वय समितीचे प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर यांच्याकडे पोलिसांकडून होणार्या सौम्य लाठीमाराविषयी तक्रार केली होती. या तक्रारींची नोंद घेऊन गिरीश वालावलकर यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून होत असलेल्या प्रकाराची माहिती दिलीे. अद्यापही अनेक गणेशमूर्ती न्यायच्या शेष असल्यामुळे यापुढे भाविकांच्या गर्दीमध्ये वाढ होऊ शकते. त्यामुळे ‘प्रशासनाने गर्दीचे व्यवस्थापन करण्याविषयी योग्य ती कार्यवाही करावी’, असे समितीने तक्रारीत म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाकायदा आणि सुव्यवस्थेसाठी नेहमी सहकार्य करणार्या हिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस उत्सवांतील गर्दीचे व्यवस्थापन का करत नाहीत ? सहिष्णु हिंदूंवर लाठीमार करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या धार्मिक उत्सवांत हस्तक्षेप करायलाही घाबरतात, ही वस्तूस्थिती आहे ! |