चीनची हेरगिरी करणारी दुसरी नौका श्रीलंकेत येणार !

भारताचा विरोध !  

कोलंबो (श्रीलंका) – चीन श्रीलंकेत तिची ‘शी यान-६’ ही संशोधनाच्या नावाखाली हेरगिरी करणारी अत्याधुनिक नौका श्रीलंकेत पाठवणार आहे. चीनने श्रीलंकेच्या नौदलाकडे यासाठी मागितलेली अनुमती त्याच्याकडून देण्यात आली आहे. यासह संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालय यांना अनुमती देण्यासाठी शिफारसही केली आहे. त्यामुळे येत्या ६ ऑक्टोबरला ही नौका श्रीलंकेत पोचणार आहे. गेल्या वर्षी चीनने तिची ‘युआन वेग-५’ ही हेरगिरी करणारी नौका श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरावर पाठवली होती. याला भारताने विरोध केला होता; मात्र या विरोधाकडे दुर्लक्ष करून श्रीलंकेने या नौकेला येण्याची अनुमती दिली होती. आताही भारताने ‘शी यान-६’ या नौकेला श्रीलंकेत येण्याची अनुमती देण्याला विरोध केला आहे. तथापि श्रीलंकेतील काही संरक्षणतज्ञांनी चीनला अशी अनुमती देण्याला विरोध केला आहे.

चीनचा धूर्तपणा !

चीन हेरगिरी करणार्‍या नौकांना संशोधन करणारी नौका असल्याचे सांगतो; मात्र प्रत्यक्षात त्यावर सैनिकी हेरगिरी यंत्रणा असते. श्रीलंकेच्या बंदरावर येणार्‍या चीनच्या नौकेच्या टप्प्यात भारतातील आंध्रप्रदेश, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांचे सागरी किनारे येतात. गेल्या वर्षी श्रीलंकेच्या हंबनटोटामध्ये संशोधनाच्या नावाखाली आलेल्या नौकेवर क्षेपणास्त्र प्रणाली होती.

संपादकीय भूमिका 

श्रीलंकेला दिवाळखोरीत सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍या भारताचा विरोध डावलून श्रीलंका चीनला अशा प्रकारे साहाय्य करतच रहाणार असेल, तर भारताने त्याला साहाय्य करण्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे ! भारताने गांधीवादी भूमिका घेऊन आत्मघात करू नये, असेच जनतेला वाटते !