स्‍मारकांच्‍या उभारणीमध्‍ये जुन्‍या-नव्‍या पद्धतीचा संगम करावा ! – अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

छत्रपती संभाजी महाराज आणि हुतात्‍मा राजगुरु स्‍मारक यांच्‍या विकासाचा आढावा !

अजित पवार, उपमुख्‍यमंत्री

पुणे – छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या वढू बु. आणि तुळापूर येथील स्‍मारकाचा विकास करतांना स्‍मारकांच्‍या उभारणीमध्‍ये जुन्‍या-नव्‍या पद्धतीचा संगम करत मजबूत ऐतिहासिक दृश्‍य स्‍वरूपातील आणि दर्जेदार साहित्‍याचा वापर करावा. हुतात्‍मा राजगुरु यांचे राजगुरुनगर येथील स्‍मारकही भव्‍य आणि प्रेरणादायी होईल, असे विकसित करावे, असे निर्देश उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्‍यमंत्री पवार यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्‍या बैठकीत दोन्‍ही स्‍मारकांच्‍या विकासाचा आढावा घेतला, तसेच ‘महाराष्‍ट्र ऑलम्‍पिक भवन’ आराखड्याविषयी माहिती घेतली. महाराष्‍ट्र ऑलम्‍पिक भवनच्‍या आराखड्याचेही या वेळी सादरीकरण करण्‍यात आले.

या वेळी आमदार दिलीप मोहिते पाटील, चेतन तुपे, सुनील टिंगरे, विभागीय आयुक्‍त सौरभ राव, पोलीस आयुक्‍त रितेश कुमार आदी उपस्‍थित होते.

उपमुख्‍यमंत्री म्‍हणाले की, 

१. छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या स्‍मारकाच्‍या २६९ कोटी २४ लाख रुपयांच्‍या पहिल्‍या टप्‍प्‍यातील विकासासाठी निविदा प्रक्रिया झाली आहे. या आराखड्यात अत्‍याधुनिक संकल्‍पनांचा वापर करून महाराजांशी संबंधित ऐतिहासिक घटनांचे सादरीकरण आहे.

२. अत्‍याधुनिक तंत्रज्ञानामुळे सादरीकरणाला एक प्रकारचा जीवंतपणा येणार आहे. स्‍मारकांच्‍या उभारणीमध्‍ये दगडी कातीव, कोरीव बांधकाम, बीड जिल्‍ह्यातील मातीच्‍या वैविध्‍यपूर्ण विटा आदींचा वापर करत बांधकामाला मजबुती येईल अशा पद्धतींचा अवलंब करावा.

३. हुतात्‍मा राजगुरु यांच्‍या स्‍मारकात २५३ कोटीचा आराखडा असून जन्‍मखोली, थोरला वाडा, संग्रहालय, तालिम, वाचनालय आदी भाग विकसित करण्‍यात येणार आहे. यामध्‍येही अत्‍याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍यात येणार आहे. तसेच पारंपरिक बांधकाम शैलीचाही सुयोग्‍य वापर करावा, अशाही सूचना पवार यांनी दिल्‍या आहेत.

४. नदीच्‍या कडेला बांधकाम करतांना नदीच्‍या नैसर्गिक प्रवाहाला कोणताही बाधा येणार नाही यासाठी सर्व पर्यावरणाच्‍या नियमांचे पालन करावे; तसेच नदीच्‍या अनुषंगाने लाल रेषा, निळी रेषाविषयीच्‍या अटींचे काटेकोर पालन करावे, अशाही सूचना केल्‍या.