फैसलाबाद (पाकिस्तान) येथे धर्मांध मुसलमानांकडून अनेक चर्चची तोडफोड आणि जाळपोळ !

ख्रिस्ती स्वच्छता कर्मचार्‍याने कुराणाचा कथित अवमान केल्याचा दुष्परिणाम !

फैसलाबाद (पाकिस्तान) – पाकच्‍या पंजाब प्रांतातील फैसलाबाद जिल्‍ह्यातील काही चर्चमध्‍ये तोडफोड आणि जाळपोळ करण्‍यात आल्‍याच्‍या घटना घडल्‍या आहेत. एका ख्रिस्‍ती स्‍वच्‍छता कर्मचार्‍यावर कुराणाचा अवमान केल्‍याच्‍या आरोपावरून ही आक्रमणे करण्‍यात आली. धर्मांध मुसलमानांनी काही ख्रिस्‍त्‍यांच्‍या घरांवरही आक्रमणे केली. पोलिसांनी या प्रकरणी ख्रिस्‍ती स्‍वच्‍छता कर्मचार्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंदवला आहे. (कायदा हातात घेणार्‍या धर्मांध मुसलमानांवर कोणतीही कारवाई होणार नाही, हेच पाकचे वैशिष्‍ट्य आहे ! – संपादक)

१. पाकमधील दैनिक ‘डॉन’ने प्रसिद्ध केलेल्‍या वृत्तानुसार फैसलाबाद जिल्‍ह्याच्‍या जारनवाला तालुक्‍यात इम्रान भट्टी या पाद्य्राने दिलेल्‍या माहितीनुसार येथील ईसा नगरी भागातील सॅल्‍वेशन आर्मी चर्च, युनायटेड प्रेस्‍बिटेरियन चर्च, एलाईड फाऊंडेशन चर्च आणि शेहरूनवाला चर्च यांमध्‍ये तोडफोड करण्‍यात आली. यासह संबंधित स्‍वच्‍छता कर्मचार्‍याच्‍या घरावर आक्रमण करून ते पाडण्‍यात आले.

२. ‘पाकिस्‍तान बिशप चर्च’चे अध्‍यक्ष आझाद मार्शल यांनी ट्‍वीट करून म्‍हटले की, आम्‍ही बिशप (वरिष्‍ठ पाद्री), पाद्री आणि सर्वसामान्‍य नागरिक जारनवाला येथील घटनेविषयी दुःखी आहोत. मी हे ट्‍वीट करत असतांनाच एक चर्च जाळण्‍यात येत आहे. येथे बायबलचा अवमान केला जात आहे. ख्रिस्‍त्‍यांवर कुराणचा अवमान केल्‍याचा खोटा आरोप करून त्‍यांचा छळ केला जात आहे. आम्‍ही प्रशासनाकडे न्‍याय देण्‍याची, संबंधितांवर कारवाई करण्‍याची, तसेच ख्रिस्‍त्‍यांना संरक्षण देण्‍याची मागणी करत आहोत.

३. चर्चवरील आक्रमणांचे अनेक व्‍हिडिओ सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित होत आहेत. याविषयी सामाजिक माध्‍यमांवरून प्रतिक्रियाही व्‍यक्‍त करण्‍यात येत आहेत. एका व्‍यक्‍तीने लिहिले आहे की, हा आहे कट्टरतावादी आणि आतंकवादी देश पाकिस्‍तानचा खरा चेहरा !

१०० हून अधिक जणांना अटक !

या हिंसाचाराच्‍या प्रकरणी पोलिसांनी धर्मांध संघटना ‘तहरीक-ए-लब्‍बैक पाकिस्‍तान’च्‍या (टीएल्‌पी’च्‍या) कार्यकर्त्‍यांसह १०० हून अधिक जणांना अटक केली आहे. सध्‍या हिंसाचार घडलेल्‍या ठिकाणी ३ सहस्र पोलीस आणि पाकिस्‍तानी सैनिक तैनात करण्‍यात आले आहेत.

पाकचे कार्यवाहक पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी या हिंसाचाराची चौकशी करण्‍यासाठी समितीची स्‍थापना करण्‍याचा आदेश दिला आहे. त्‍यानंतर पंजाब सरकारने समिती स्‍थापन करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

अमेरिकेची टीका !

अमेरिकेच्‍या परराष्‍ट्र मंत्रालयाचे प्रवक्‍ते वेदांत पटेल यांनी या हिंसाचारावर म्‍हटले आहे की, या घटनेमुळे आम्‍ही चिंतित आहोत. अमेरिका अभिव्‍यक्‍ती स्‍वातंत्र्याचे समर्थन करते; मात्र हिंसा किंवा हिंसेची धमकी कधीही अभिव्‍यक्‍तीच्‍या रूपामध्‍ये स्‍वीकारता येणार नाही. पाकच्‍या अधिकार्‍यांनी या हिंसाचाराची चौकशी करून शांतता निर्माण करावी.

हिंसाचारामागे सुनियोजित षड्‍यंत्र ! – पंजाब सरकारचे मंत्री

पंजाब सरकारचे अंतरिम सूचना मंत्री अमीर मीर यांनी म्‍हटले की, हा हिंसाचार एक सुनियोजित षड्‍यंत्र आहे. जनतेच्‍या भावना भडकावून शांतता भंग करण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. सध्‍या स्‍थिती नियंत्रणात आहे. कुराणचा अवमान करण्‍याच्‍या घटना वाढत आहेत; मात्र कायदा हातात घेणार्‍यांच्‍या विरोधात कारवाई केली जाईल. त्‍यांना तात्‍काळ अटक करण्‍यात येईल.

संपादकीय भूमिका

  • भारतात धर्मांध मुसलमान हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करून तोडफोड करतात; मात्र हिंदू कधी हिंदु धर्माचा अवमान केल्यावरून मशिदी, मदरसे यांवर आक्रमण करून त्यांची तोडफोड करत नाहीत, हे निधर्मीवादी लक्षात घेतील का ?
  • पाकिस्‍तानमध्‍ये देवतांचा अवमान केल्‍याच्‍या प्रकरणी फाशीची शिक्षा करण्‍याची तरतूद असतांना धर्मांध मुसलमान कायदा हातात घेतात, तर भारतात अशा प्रकारची कोणतीही कठोर शिक्षा नाही, तरीही हिंदू वैध मार्गाने कारवाई करण्‍याची मागणी करत रहातात ! तरीही त्‍यांना ‘असहिष्‍णु’ म्‍हणून हिणवले जाते !