सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील दृढ श्रद्धेच्‍या बळावर कर्करोगासारख्‍या दुर्धर दुखण्‍यावर मात करत ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठलेल्‍या सौ. नम्रता ठाकूर (वय ६२ वर्षे) !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याप्रती कृतज्ञताभावात रहाणार्‍या अणि सतत सेवेचा विचार करणार्‍या सौ. नम्रता ठाकूर !

सौ. नम्रता ठाकूर यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र आणि शाल भेट देतांना सद़्‍गुरु अनुराधा वाडेकर

१. सौ. नम्रता ठाकूर यांना सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे छायाचित्र दिल्‍यावर त्‍यांच्‍या चेहर्‍यावर स्‍मितहास्‍य उमटून कृतज्ञताभाव दिसणे

‘२.८.२०२३ या दिवशी मी सौ. नम्रता ठाकूरकाकू यांना त्‍यांच्‍या ठाणे येथील निवासस्‍थानी भेटायला गेले होते. प.पू. डॉक्‍टरांनी (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) ठाकूरकाकूंसाठी शाल आणि त्‍यांचे (गुरुदेवांचे) छायाचित्र पाठवले होते. मी ते त्‍यांना दिले. प.पू. डॉक्‍टरांचे छायाचित्र भेट दिल्‍यावर त्‍यांच्‍या चेहर्‍यावर स्‍मितहास्‍य आणि कृतज्ञताभाव दिसत होता.

२. सतत सेवेचा विचार करणार्‍या सौ. नम्रता ठाकूर !

सद्गुरु अनुराधा वाडेकर

या वेळी माझी श्री. नंदकिशोर ठाकूरकाका यांच्‍याशी भेट झाली. ठाकूरकाका मला म्‍हणाले, ‘‘एकदा त्‍यांनी (सौ. नम्रता ठाकूर यांनी) लिखाणासाठी वही मागून घेतली. त्‍यावर ‘श्री’, असे लिहीपर्यंत त्‍यांचे हात थरथरू लागल्‍याने त्‍यांनी लिखाण थांबवले. नंतर त्‍यांनी भ्रमणसंगणक (लॅपटॉप) मागून घेऊन त्‍यावर लिहिण्‍याचा प्रयत्न केला; पण त्‍यांच्‍या अंगात शक्‍ती नसल्‍याने त्‍यांना त्‍यावरही लिहिता येत नव्‍हते. मग त्‍यांनी तो ठेवून देण्‍यास सांगितला. हे पहातांना त्‍यांच्‍या मनात सतत सेवेचे विचार येत आहेत’, असे मला वाटते.’’

(सद़्‍गुरु) कु. अनुराधा वाडेकर, ठाणे सेवाकेंद्र (१२.८.२०२३)


 ‘गुरुदेव (सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), या जिवाविषयी (सौ. नम्रता ठाकूर यांच्‍याविषयी) तुम्‍ही सर्वकाही जाणता. या जिवाविषयीचे आपल्‍याला अपेक्षित असे लिखाण आपणच करून घेण्‍याची कृपा करावी. मी निमित्तमात्र आहे.

सौ. नम्रता ठाकूर

१. ठाणे जिल्‍ह्यात श्री. ठाकूर काका-काकू यांचे घर हे सर्व साधकांचे हक्‍काचे स्‍थान असणे

श्री. ठाकूरकाका-काकू यांचे घर, म्‍हणजे आपुलकीने सर्वांचे स्‍वागत करणारे आणि दुःखात प्रत्‍येकाला आधार वाटणारे हक्‍काचे ठिकाण ! काकूंचे घर इतक्‍या मोक्‍याच्‍या ठिकाणी आहे की, ‘स्‍थानकावर जाणारा किंवा बाजारात जाणारा प्रत्‍येक साधक त्‍यांच्‍या घरी कुठल्‍या ना कुठल्‍या सेवेच्‍या निमित्ताने अगदी सहज जातो. त्‍यांच्‍या घरातील सर्वांचा ‘हा सनातनचा आश्रमच आहे’, असा भाव आहे. गेली अनेक वर्षे साधक त्‍यांच्‍या घरी सेवेशी संबंधित सर्व साहित्‍य ठेवणे-आणणे, संगणकीय सेवा करणे, सत्‍संग घेणे इत्‍यादी सेवा करतात. ठाकूरकाका आणि काकू यांनी नेहमीच प्रत्‍येकाचे आनंदाने स्‍वागत केले आहे. काकू साधकांची विचारपूस करून प्रेमाने त्‍यांना खाऊही घालत असत.

२. ठाण्‍यातील साधिकांचा आधार बनलेल्‍या सौ. ठाकूरकाकू !

सौ. ठाकूरकाकूंची ठाण्‍यातील साधिकांशी पुष्‍कळ जवळीक आहे. काही साधिका ठाकूरकाकूंना वैयक्‍तिक अडचणी किंवा होणारा त्रास मोकळेपणाने सांगतात आणि ठाकूरकाकूही मनापासून अन् आत्‍मीयतेने त्‍यांना साहाय्‍य करतात. त्‍यामुळे ठाकूरकाकूंच्‍या संपर्कात येणार्‍या बहुतेक साधिकांच्‍या त्‍या आध्‍यात्मिक आईच झाल्‍या आहेत. अनेक साधिकांना त्‍यांचा मोठा आधार वाटतो.

३. सौ. ठाकूरकाकूंमध्‍ये अनेक गुणांचा समुच्‍चय असणे

सौ. नम्रता ठाकूरकाकू नावाप्रमाणेच नम्र असून त्‍यांच्‍यामध्‍ये ‘भाव, प्रेमभाव, शिकण्‍याची वृत्ती, साधनेत पुढे जाण्‍याची तळमळ आणि जिज्ञासा’, असे अनेक गुण आहेत.

४. संतांचे त्‍वरित आज्ञापालन करणे

मागे एकदा मी त्‍यांना म्‍हणाले, ‘‘काकू, तुमच्‍यात व्‍यष्‍टी भाव चांगला आहे. आता तुम्‍ही समष्‍टी भाव वाढवण्‍यासाठी प्रयत्न करा.’’ त्‍याप्रमाणे त्‍यांनी तत्‍परतेने समष्‍टी सेवेतील आढावे घेण्‍यास आरंभ केला.

५. साधकांना आध्‍यात्मिक स्‍तरावरील नामजपादी उपाय सांगण्‍याच्‍या सेवेत सौ. ठाकूरकाकूंविषयी जाणवलेली सूत्रे 

५ अ. सौ. ठाकूरकाकू ठाणे जिल्‍ह्यातील साधकांना आध्‍यात्मिक स्‍तरावरील नामजपादी उपाय सांगण्‍याची सेवा मनापासून करत असणे : ठाकूरकाकूंकडे ठाणे जिल्‍ह्यातील साधकांना नामजपादी उपाय सांगण्‍याचे दायित्‍व आहे. (म्‍हणजे ठाणे जिल्‍ह्यातील साधक त्‍यांना होणारे आध्‍यात्मिक त्रास ठाकूरकाकूंना कळवतात. त्‍या त्रासासाठी कुठले नामजपादी उपाय करायचे, ते ठरवून त्‍या ते मला विचारून घेऊन मग साधकांना पाठवतात.) त्‍या निमित्ताने मी त्‍यांच्‍या संपर्कात असते.

५ अ १. साधकांना होणार्‍या त्रासावर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेला नामजप शोधून सांगणे : सद़्‍गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी काही त्रासांसाठी आध्‍यात्मिक स्‍तरावरील नामजपादी उपाय सांगितले आहेत. ते उपाय दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध झाले आहेत. त्‍याचा ठाकूरकाकूंनी पुष्‍कळ चांगला अभ्‍यास केला आहे. ठाणे जिल्‍ह्यातील साधकांनी त्‍यांना होणार्‍या त्रासांविषयी विचारल्‍यावर ठाकूरकाकू दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये आलेला नामजप अचूक शोधून साधकांना सांगत असत.

५ अ २. शिकण्‍याची वृत्ती : मी त्‍यांना आध्‍यात्मिक उपायांच्‍या संदर्भात कुठलेही सूत्र सांगितले, तर त्‍या ते समजून आणि लगेच लिहून घेत असत. त्‍याविषयी त्‍यांना काही शंका असल्‍यास त्‍या त्‍वरित मला विचारून घेत असत. पुढच्‍या वेळेस ते सूत्र लक्षात ठेवून तशी कृती करण्‍याचा त्‍या प्रयत्न करत असत.

५ अ ३. साधकांना झालेल्‍या दुखण्‍याविषयी वैद्यांना विचारून निश्‍चिती करूनच त्‍यावरील नामजपाचे उपाय सांगणे : ‘साधकांना काही दुखणे झाले असल्‍यास, त्‍याचेे स्‍वरूप नीट कळावे आणि त्‍यावर योग्‍य नामजपाचे उपाय देता यावे’, यासाठी त्‍या वैद्यांना विचारून त्‍याविषयी निश्‍चिती करून घेत असत. त्‍यानंतर त्‍यावरील नामजपादी उपायांविषयी माझ्‍याकडून निश्‍चिती करून मगच त्‍या साधकांना उपाय पाठवत असत.

५ अ ४. साधकांना होणारे त्रास लवकर न्‍यून होण्‍यासाठी सतत प्रयत्नरत असणे : ‘साधकांना होणारे शारीरिक त्रास लवकर न्‍यून व्‍हावेत’, याविषयी त्‍यांच्‍या मनात सतत विचार असायचे. त्‍यासाठी त्‍या ‘साधकांचे त्रास समजून घेऊन साधक त्‍यावर वैद्यकीय उपचार घेत आहेत ना ?’, याची निश्‍चिती करत. नंतर ‘त्‍यासाठी कुठले नामजपाचे उपाय देऊ शकतो ?’, हे त्‍या मला लिहून विचारत असत. साधकांना त्‍वरित आणि योग्‍य उपाय मिळावेत’, यासाठी त्‍या प्रयत्न करत असत. उपायांच्‍या समवेतच त्‍या साधकांना भावाचे प्रयत्न करायला सांगत असत. उपाय केल्‍यावर त्‍या साधकाला आता ‘बरे वाटत आहे ना ?’, हे त्‍या विचारून घेत आणि बरे वाटत नसल्‍यास पुन्‍हा उपाय विचारून कळवत असत.

६. कर्करोगाने रुग्‍णाईत होणे

६ अ. कर्करोगामुळे होणार्‍या असह्य वेदनांवर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍यावरील श्रद्धेच्‍या बळावर मात करून ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठणे : सौ. ठाकूरकाकूंना २ वेळा कर्करोग झाला. वर्ष २०१४ मध्‍ये त्‍या पोटाच्‍या कर्करोगामुळे रुग्‍णाईत होत्‍या. त्‍या प्रतिकूल परिस्‍थितीतही ठाकूरकाकू भावाच्‍या स्‍थितीत राहिल्‍या. गुरुदेवांवरील श्रद्धेच्‍या बळावर असह्य वेदनांवर मात करून त्‍या सातत्‍याने अनुसंधानात राहिल्‍या. याच काळात ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळी गाठून त्‍या जन्‍म-मृत्‍यूच्‍या फेर्‍यांतून मुक्‍तही झाल्‍या.

६ आ. यानंतर वर्ष २०१८ मध्‍ये पुन्‍हा त्‍या कर्करोगाने रुग्‍णाईत होत्‍या. तेव्‍हाही गुरुदेवांवरील श्रद्धेच्‍या बळावर त्‍या जिंकल्‍या. 

६ इ. वर्ष २०२३ मध्‍ये मेंदूत कर्करोगामुळे गाठ होणे : आता त्‍यांना मेंदूत कर्करोगाची गाठ झाली आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या स्‍मृतीवर परिणाम झाला असून त्‍या कुणाला ओळखत नाहीत. त्‍यासाठी औषधोपचार आणि  आध्‍यात्मिक स्‍तरावरील नामजपादी उपाय चालू आहेत; मात्र मी त्‍यांना भेटायला गेले, तेव्‍हा त्‍यांनी मला ओळखले. आदल्‍या दिवशीच त्‍या पुष्‍कळ तीव्रतेने माझी आठवण काढत होत्‍या आणि मलाही त्‍यांना भेटण्‍याची ओढ लागली होती. प्रत्‍यक्षात आमची भेट झाली, तेव्‍हा शब्‍दांत फारसे काहीच बोलणे झाले नाही; मात्र शब्‍दांच्‍या पलीकडचे समाधान होते.

६ ई. खडतर प्रारब्‍ध भोगतांनाही स्‍थिर असणे : वैद्यकीय दृष्‍टीने या दुखण्‍यात रुग्‍णाला सहन न करता येण्‍यासारख्‍या तीव्र वेदना होतात; पण ठाकूरकाकूंकडे पाहून तसे जाणवत नव्‍हते. त्‍यांचे डोके दुखत नव्‍हते. त्‍या पुष्‍कळ स्‍थिर होत्‍या आणि त्‍यांचा चेहरा फार तेजस्‍वी दिसत होता. त्‍यांच्‍या चेहर्‍यावर कुठलीही काळजी नव्‍हती. त्‍या समाधानी दिसत होत्‍या.

७. प्रारब्‍ध कितीही खडतर असले, तरी गुरुकृपा आणि श्रद्धा यांच्‍या बळावर त्‍यावर मात करता येत असल्‍याची प्रचीती येणे

प्रारब्‍ध कितीही खडतर असले, तरी ठाकूरकाकूंसारखी श्रद्धेने साधना करत राहिल्‍यास ‘श्री गुरु काय करू शकतात ?’, हे मला प्रत्‍यक्ष अनुभवता आले. ‘श्री गुरु त्‍या जिवाला साधनेचा आनंद कसा देतात ? भगवंतही देऊ शकत नाही, ते समाधान त्‍या जिवाला कसे देतात ? गुरुकृपेच्‍या पुढे प्रारब्‍धाचे डोंगरही कसे वितळून जातात ?’, याची मला प्रचीतीच आली.

७ अ. सौ. ठाकूरकाकूंवर असलेली गुरुकृपा ! : साधा ताप आला, तरी आपल्‍याला नामजप करायला सुचत नाही. इथे तर दुर्धर दुखण्‍यात ठाकूरकाकूंचे भावाचे प्रयत्न, अनुसंधान, प्रार्थना आणि सेवा चालू होत्‍या ! त्‍यांच्‍या घरातीलही सर्व जण स्‍थिर होते. ते पाहून मला पुष्‍कळ आश्‍चर्य वाटले. किती ही गुरुकृपा ….!!

८. सौ. ठाकूरकाकूंच्‍या असंबद्ध बोलण्‍यातही त्‍यांचे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍याशी असलेले अनुसंधान !

या दुखण्‍यामुळे त्‍यांचे बोलणे असंबद्ध होत असले, काळ किंवा वेळ याला धरून नसले, तरी ते बोलणे गुरुदेवांशी संबंधित असते, उदा, ‘गुरुदेव येणार आहेत. त्‍यांची यायची वेळ झाली आहे. सर्वांनी लवकर सिद्धता करा.’ त्‍यांचे असे बोलणे, म्‍हणजे त्‍यांचे गुरुदेवांशी असलेले अनुसंधानच आहे. या स्‍थितीतही त्‍या घरातील व्‍यक्‍तींकडून जयघोष करून घेतात !

९. संतांविषयी असलेला भाव !

मी त्‍यांना भेटून निघतांना त्‍यांच्‍या सुनेने त्‍यांना विचारले, ‘‘यांना आपल्‍याकडे राहू दे का ?’’, तेव्‍हा त्‍या म्‍हणाल्‍या, ‘‘हो. त्‍यांचेच घर आहे, आपले कुठे आहे ?’’ यातून त्‍यांचा संतांप्रतीचा भाव मला अनुभवता आला. ठाकूरकाका म्‍हणतात, ‘त्‍या अध्‍यात्‍म जगतात.’ त्‍याची मला प्रत्‍येक क्षणी जाणीव होत होती.’

१०. ‘देह प्रारब्धावरी सोडा, चित्त चैतन्याशी जोडा।’ हे ठाकूरकाकूंनी प्रत्यक्ष आचरणात आणले आहे. 

११. कुठलेही गार्‍हाणे न करता परिस्‍थिती स्‍वीकारून साधनेचे प्रयत्न करणार्‍या सौ. नम्रता ठाकूरकाकू !

‘माझ्‍या जीवनात दुःख का ? साधना करत असूनही मला एवढे मोठे दुखणे का झाले ?’, असे प्रश्‍न अनेकांच्‍या मनात असतात; पण ठाकूरकाकूंनी ती परिस्‍थिती मनापासून स्‍वीकारली असून त्‍यांचे त्‍याविषयी कुठलेही गार्‍हाणे नाही कि ‘त्‍यांनी कधी नशिबाला दोष दिला’, असे मी पाहिले नाही. त्‍या कधी नाराज किंवा निराशही झाल्‍या नाहीत. त्‍याही परिस्‍थितीत त्‍या ‘साधनेचे प्रयत्न कसे वाढवू ?’, असा विचार करतात. गुरुदेवांच्‍या सतत अनुसंधानात राहून त्‍यांनी दुर्धर दुखणे आणि तीव्र प्रारब्‍ध यांवर मात केली आहे.

‘प्रारब्‍ध कितीही खडतर असले, तरी गुरुकृपेने त्‍यावर मात करता येऊ शकते आणि आध्‍यात्‍मिक प्रगतीही होऊ शकते’, याचे आदर्श उदाहरण म्‍हणजे सौ. नम्रता ठाकूरकाकू !

१२. कृतज्ञता

गुरुदेवांच्‍या अपार कृपेमुळे मला ठाकूरकाकूंकडून शिकायला मिळाले आणि ‘गुरुदेवांची त्‍यांच्‍यावर किती कृपा आहे’, हे अनुभवता आले’, यासाठी श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !

– (सद़्‍गुरु) अनुराधा वाडेकर, ठाणे (१२.८.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक