रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प ! – पालकमंत्री उदय सामंत

  •  पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण !

  • रस्त्यांचे काँक्रीटीकरण, शिवसृष्टी, रत्नागिरी आणि खेड येथील नाट्यगृहे करण्याकडे भर

ध्वजाला सलामी देतांना पालकमंत्री उदय सामंत (मध्यभागी)

रत्नागिरी – कोकणातील सर्वांत मोठी शिवसृष्टी, छत्रपती संभाजी महाराजांचा उंच पुतळा, ३ डी मल्टीमिडिया इव्हेंट थिबा पॅलेस परिसरात उभारण्यात येणार आहे. शासनाने त्यासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण अशा शहरांतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यासाठी १५० कोटी रुपये, रत्नागिरीतील स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहासाठी १० कोटी, खेड येथील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी साडेतीन कोटी, विभागीय क्रीडा संकुलासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

विमानतळ जमिनीच्या भूसंपादनासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, येत्या काही दिवसांत ‘नाईट लँडींग’ची सुविधा चालू होणार आहे. वर्षभरात विमानसेवा चालू होईल, अशी ग्वाही देऊन रत्नागिरीला जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प केल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

येथील पोलीस कवायत मैदानात पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी,अन्य अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजाला सलामी देतांना संचलनात सहभागी पोलीस 

पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, ‘‘मागील मासात काही दिवस पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्हा प्रशासनाने याची पूर्व सिद्धता चांगल्या प्रकारे केली होती. राज्यात एकमेव रत्नागिरी जिल्हा आहे की, तहसील कार्यालयात सर्वाधिक उंच ध्वजस्तंभ उभारण्यात येत आहे. लवकरच जिल्ह्याच्या मुख्यालयातही सर्वांत उंच ध्वजस्तंभावर तिरंगा फडकावण्यात येईल. जिल्ह्यातील विकासकामांसाठी यापूर्वी असणार्‍या २४० कोटी रुपयांमध्ये शासनाने ६० कोटी रुपयांची वाढ करून तो ३०० कोटी रुपये इतका केला आहे.

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमामध्ये आतापर्यंत सर्व विभागाच्या योजनांचा लाभ १ लाख ६२ सहस्र ८४५ लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये जी.एन्.एम्., ए.एन्.एम्., संस्कृत विद्यापीठ २५० कोटी खर्च करून अभियांत्रिकी महाविद्यालय चालू झाले आहे. ५२२ कोटी खर्चून वैद्यकीय महाविद्यालय चालू झाले आहे. त्याचसमवेत ‘स्किल सेंटर’ चालू झाले आहे. येत्या दोन मासांत विधी महाविद्यालयही चालू
करणार आहोत.’’