वाई (जिल्हा सातारा) येथील न्यायालयात गोळीबार !

वाई येथील न्यायालयात गोळीबार

कराड, ८ ऑगस्ट (वार्ता.) – येथील मेणवली गावातील हॉटेल मालक राजेश नवघणे यांच्याकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी ३ जण अटकेत आहेत. त्यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना न्यायालयात आणले होते. या वेळी नवघणे यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. नवघणे यांनी २ गोळ्या झाडूनही त्या कुणाला लागल्या नाहीत. पोलिसांनी तत्परतेने नवघणे यांना कह्यात घेतले.

 (सौजन्य : Zee 24 Taas)

हॉटेल चालक राजेश नवघणे यांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांना खंडणी मागण्यात आली होती. नवघणे यांच्या तक्रारीनंतर ३ जणांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी नवघणे यांना शांत रहाण्यास सांगितले होते. तरीही न्यायालयात अनुचित प्रकार घडण्याची पूर्वकल्पना पोलिसांना असल्यामुळे त्यांनी अतिरिक्त बंदोबस्त ठेवला होता. सशस्त्र पोलीस साध्या वेशात न्यायालय परिसरात फिरत होते. मागील तारखेस पोलिसांनी नवघणे यांना हटकले होते; मात्र या वेळी नवघणे हे अधिवक्त्याचा वेश करून हातात फाईल घेऊन न्यायालयात आले होते. फाईलमध्ये पिस्तुल ठेवून ते जिथे आरोपी उपस्थित रहाणार आहेत, तिथे उभे राहिले. अजून वेळ असल्यामुळे आरोपींना बाकावर बसवण्यात आले होते. या संधीचा लाभ उठवत नवघणे यांनी गोळीबार केला; मात्र जवळच असलेल्या पोलीस कर्मचार्‍याने नवघणे यांच्यावर झडप घातली. यामुळे नवघणे यांचा नेम हुकला. तत्परतेने पोलिसांनी नवघणे यांना नि:शस्त्र करत कह्यात घेतले.