आडाळी औद्योगिक वसाहतीतील भूखंडांचे वाटप न झाल्यास आंदोलन करणार ! – राजन तेली, माजी जिल्हाध्यक्ष, भाजप, सिंधुदुर्ग

आडाळी औद्योगिक वसाहत

सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहतीतील (एम्.आय.डी.सी.तील) भूखंडांच्या वाटपाविषयी १५ दिवसांत निर्णय न झाल्यास आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी भाजपचे माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

राजन तेली

तेली पुढे म्हणाले, ‘‘भविष्यात रोजगार मिळेल, या अपेक्षेने आडाळी एम्.आय.डी.सी.साठी स्थानिकांनी त्यांच्या भूमी दिल्या होत्या. वर्ष २०१४ मध्ये तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ही एम्.आय.डी.सी. संमत केली होती; मात्र स्वतःच्या मर्जीतील व्यावसायिकाला भूमी मिळवून देण्यासाठी स्थानिक आमदाराकडून जनतेला वेठीस धरले जात आहे. गेल्या ९ वर्षांत येथील भूखंडांचे वाटप करण्यात आलेले नाही. ‘मोपा’ (गोवा) विमानतळ  झाल्यामुळे या भागात चांगले उद्योग व्यवसाय निर्माण होण्यास चांगला वाव आहे. असे असतांना स्वत:च्या मर्जीतील व्यावसायिकाला भूमी देण्याचे कारण पुढे करत लोकांना वेठीस धरणे योग्य नाही.’’