‘मागील २ वर्षांपासून माझा साधनेचा आढावा पू. रेखाताई (पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे), सनातनच्या ६० व्या समष्टी संत) घेतात. या काळात त्यांनी मला माझ्यातील अनेक स्वभावदोष आणि मला येणार्या तीव्र प्रतिक्रिया यांची जाणीव करून दिली. त्यांनी आढाव्यात मला वेळोवेळी ‘प्रतिक्रिया का येतात ?’ आणि ‘त्या अल्प कशा कराव्यात ?’ याविषयी मार्गदर्शन केले. देवाने पू. रेखाताईंच्या माध्यमातून मला केलेले साहाय्य पुढे दिले आहे.
१. स्वभावदोषांविषयी झालेला अभ्यास, मिळालेले मार्गदर्शन आणि लक्षात आलेली सूत्रे
१ अ. अयोग्य प्रतिक्रिया येणे
१ अ १. व्यष्टी आढाव्याच्या वेळी ‘अयोग्य प्रतिक्रिया येणे’ या स्वभावदोषाचा अभ्यास केल्यावर लक्षात आलेली सूत्रे
अ. ‘पू. रेखाताईंनी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रयत्न करण्यास सांगितल्यावर त्यांच्या संकल्पानेच माझे बरेच स्वभावदोष न्यून होतात, सेवेत उत्साह वाढतो आणि आनंद मिळू लागतो. हे सर्व गुरूंच्या कृपेने आणि संतांच्या संकल्पाने होते’, हे माझ्या लक्षात आले.
आ. ‘चुका सर्वांकडून होत असतात; परंतु सर्वांच्याच संदर्भात प्रतिक्रिया येते’, असे नसते. ज्या साधकांविषयी आपली जवळीक नसते, पूर्वग्रह असतो किंवा प्रेमभाव अल्प असतो, अशा साधकास न्यून लेखण्याचा भाग आपल्याकडून होत असतो.
इ. स्वतःला श्रेष्ठ समजणे, कर्तेपणा असणे, तसेच ‘समोरची व्यक्ती साधक असूनही ती असे करते’, असा निष्कर्ष काढल्याने समोरच्या साधकाविषयी मनात प्रतिक्रिया येते.
इ. ‘प्रतिक्रिया आल्याने मनाचा संघर्ष होऊन दिवसभरात केलेली साधना वाया जाते आणि सेवेत निरुत्साह येऊन सेवा करू नये’, असे वाटून साधनेची हानी होते.
१ अ २. पू. रेखा काणकोणकर यांनी सांगितलेले अयोग्य प्रतिक्रिया आल्यावर करायचे उपाय आणि त्यामुळे होणारे लाभ
अ. ‘समोरच्या साधकाविषयी प्रतिक्रिया आली, तर ती लगेचच मनातून न्यून होत नाही, तर त्याला पाहिल्यावर मनात तोच तोच प्रसंग येत रहातो आणि आपण तेवढा वेळ देवापासून दूर जातो.’
आ. ‘त्याच वेळी आपण त्या साधकाला ‘त्याची चूक का झाली ?’, हे समजून त्याला लगेचच त्याची जाणीव करून द्यावी.
इ. त्या प्रसंगात ‘स्वतःचे यात काय चुकले ?’, याचेही निरीक्षण करणे आवश्यक असते.
ई. समोरचा साधक ऐकण्याच्या स्थितीत नसल्यास परिस्थिती देवावर सोपवून आपण आपली साधना करावी.
उ. एखादा साधक ऐकत नसला, तरी ‘त्याच्याकडून चुका का झाल्या ?’, हे पाहून त्याला त्या वेळेत सांगितल्या, तर त्या चुका सुधारून गुरुधनाची हानी टाळता येते. तसेच त्यातून आपलीही साधना योग्य प्रकारे होऊन समोरच्या साधकांना योग्यप्रकारे साहाय्य करता येते. त्यामुळे त्यांना आणि आपल्याला योग्य प्रकारे सेवा करता येते.
ऊ. आपणास ज्या साधकाविषयी प्रतिक्रिया आली असेल, त्या साधकाजवळ जाऊन त्याच्यातील गुरुतत्त्वाची लगेच क्षमा मागावी. त्यामुळे आपल्या मनातील प्रतिक्रिया आणि संघर्ष लगेचच नष्ट होऊन गुरुकृपा अन् चैतन्य लगेचच ग्रहण करता येते.
१ आ. ‘प्रसंग न स्वीकारणे’ या दोषावर मात करण्यासाठी करायचे उपाय
१. एखादा प्रसंग आपल्याला स्वीकारता येत नसल्यास लगेचच तो प्रसंग आणि त्यामागील दोष स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी लिहीत असलेल्या सारणीत लिहावा. प्रत्येक वेळी त्याला योग्य दृष्टीकोन दिल्यास पुढील प्रसंगावर मात करता येते आणि मनाला योग्य द़ृष्टीकोन देणे सोपे जाते.
२. वरीलप्रमाणे कृती न केल्यास संघर्षामध्ये आपल्या मनाची ऊर्जा आणि साधना वाया जात असल्याने लिहिण्याची प्रक्रिया शीघ्र गतीने करावी.
२. पू. रेखाताईंनी आढावा घेतल्यावर गुरुकृपेने आलेले विचार
पू. रेखाताईंनी आढावा घेतल्यावर गुरुकृपेनेच माझ्या मनात विचार आले, ‘जेव्हा देवाला वाटते की, माझ्या या साधकाची आता साधनेत प्रगती व्हायला हवी, तेव्हा तोच अन्य साधकांच्या माध्यमातून आपल्याला आपल्यातील उणिवांची (चुकांची) जाणीव करून देतो. अशा वेळी त्या चुका स्वीकारल्याने आणि त्यानुसार प्रयत्न करून स्वतःत पालट केल्यावर आनंद मिळतो. आनंद हा देवाचा गुण असल्याने आपण त्याच्याशी एकरूप होण्यासाठीचा आरंभ होतो.
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
हे भगवान श्रीकृष्णा, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! मला जे काही साधकांच्या माध्यमातून शिकवता, ते कृतीत येण्यासाठी आशीर्वाद द्यावा आणि आपल्या चरणी घ्यावे, हीच प्रार्थना !’
– सौ. साधना अशोक दहातोंडे , सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.९.२०२२)