‘भाविक देवळात देवाचे भक्तीभावाने दर्शन घेतात. देवळातील पुजारी काही वेळा भाविकांना प्रसादस्वरूप काही वस्तू देतात, उदा. देवाला अर्पण केलेल्या माळा, वस्त्रे आदि. देवाला अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये चैतन्य असते. त्यामुळे त्या वस्तू जवळ बाळगल्याने भक्तांना चैतन्य मिळते. सध्याचे वातावरण अतिशय रज-तमप्रधान बनले आहे. त्यामुळे चैतन्यमय वस्तूंवर रज-तमाचे आवरण येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे कोणतीही वस्तू उपयोगात आणण्यापूर्वी तिच्यावर त्रासदायक आवरण नाही ना ? याची खात्री करावी.

१. वस्तूवर आवरण आल्याचे कसे ओळखावे ?
वस्तू हातात धरल्यावर ‘मनाला काय जाणवते ?’, याचा अभ्यास करावा. वस्तू हातात धरल्यावर मनाला त्रासदायक जाणवले, तर ‘वस्तूवर आवरण आहे’, असे समजावे. वस्तू हातात धरल्यावर मनाला चांगली स्पंदने जाणवल्यास ‘वस्तूवर आवरण नाही’, असे समजावे. काही वेळा मनाला त्रासदायक अन् चांगली अशी दोन्ही प्रकारची स्पंदने जाणवतात. अशा वेळीही ‘वस्तूवर आवरण आहे’, असे समजावे.

२. वस्तूची शुद्धी केल्यावर त्यातील त्रासदायक स्पंदने नाहीशी होणे
जुलै २०२३ मध्ये एका भाविकांना शिवपिंडीला अर्पण केलेल्या रुद्राक्षाच्या माळा प्रसादस्वरूप मिळाल्या होत्या. त्यांनी त्या माळा प्रेमपूर्वक एका आध्यात्मिक संस्थेला भेट म्हणून दिल्या. या माळा हातात घेतल्यावर त्यांवर त्रासदायक आवरण असल्याचे जाणवले. या माळांचे ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे आणि लोलकाने परीक्षण करण्यात आले. यातून माळांमध्ये पुष्कळ प्रमाणात नकारात्मक ऊर्जा अन् अल्प प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळून आले. या माळांवर लोलक धरल्यावर त्याने माळांमध्ये नकारात्मक स्पंदने असल्याचे दर्शवले. त्यानंतर या माळांची शुद्धी (टीप) करून पुन्हा त्यांचे परीक्षण केल्यावर त्या माळांतील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन त्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढल्याचे दिसून आले. या माळांवर लोलक धरल्यावर त्याने माळांमध्ये सकारात्मक स्पंदने असल्याचे दर्शवले.
(टीप – वस्तूची शुद्धी करणे म्हणजे त्यावरील त्रासदायक आवरण काढणे. आवरण काढण्याच्या विविध पद्धती आहेत, उदा. वस्तू काही वेळ उन्हात ठेवणे, वस्तूला सात्त्विक उदबत्तीचा धूर दाखवणे, वस्तूची दृष्ट काढणे इत्यादी.)
‘वस्तूच्या छायाचित्रावरील आवरण काढल्यास त्यातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांमध्ये काही पालट होतो का ?’, हे अभ्यासण्यासाठी आम्हाला एक प्रयोग सुचला. यामध्ये साधकाने हाताने नामजप करत साधारण ३ ते ५ मिनिटे माळांच्या छायाचित्रांवरील आवरण काढले. असे केल्यावर त्यातून प्रक्षेपित होणारी नकारात्मक स्पंदने नाहीशी होऊन त्यातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ वाढ झाली, असे आमच्या लक्षात आले.
थोडक्यात वस्तूवर आवरण असतांना तिचा उपयोग केल्यास भाविकाला त्यातील त्रासदायक स्पंदनांचा त्रास होऊ शकतो. असे होऊ नये, म्हणून तिची शुद्धी करून मग ती वापरणे श्रेयस्कर !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.७.२०२३)
इ-मेल : mav.research2014@gmail.com