मोहनदास करमचंद गांधींना समजून घेतांना….

काही दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी ‘मोहनदास गांधी यांचे वडील मुसलमान जमीनदार होते’, असे विधान केल्याचे आरोप करण्यात आले. यावरून महाराष्ट्र राज्यात आणि विधीमंडळात गदारोळ केला गेला, तसेच पू. भिडेगुरुजी यांना अटक करण्याची मागणी काँग्रेस अन् अन्य राजकीय पक्ष करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गांधी यांच्या लांगूलचालनाच्या भूमिकेमुळे राष्ट्राच्या होत असलेल्या हानीविषयीचा ऊहापोह करणारा लेख येथे देत आहोत.

मोहनदास करमचंद गांधी यांना ‘महात्मा’ आणि ‘राष्ट्रपिता’, अशा उपाधीने सन्मानित करण्यात आले. या दोन्ही उपाध्या त्यांना जनतेने दिल्या आहेत. ‘मी महात्मा नाही मी अल्पात्मा आहे’, असे गांधी आत्मचरित्रात लिहिले होते. तरीही त्यांच्या नावापूर्वी ‘महात्मा’ ही उपाधी आवर्जून लिहिली जाते. भारत सरकारने अधिकृतपणे मोहनदास करमचंद गांधी यांना ‘राष्ट्रपिता’ असे घोषित केलेले नाही. त्यामुळे त्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हटलेच पाहिजे, असे बंधन नाही.

१. त्रेतायुगाच्याही आधीपासून भारतमाता असल्याने गांधी तिचे पिता कसे होऊ शकतात ?

श्री. दुर्गेश परुळकर

दुसरी गोष्ट म्हणजे गांधींची श्रीराम आणि श्रीकृष्ण यांवर नितांत भक्ती होती. ‘देशात रामराज्य यावे’, असे ते म्हणत असत. याचा अर्थ त्यांना श्रीराम प्रिय होता, असा होतो. प्रभु श्रीरामाने ‘मला माझी जन्मभूमी, माझी मातृभूमी स्वर्गापेक्षा अधिक प्रिय आहे’, असे उद्गार काढले होते. याचा अर्थ ही मातृभूमी म्हणजेच आपली भारतमाता श्रीरामाच्या काळात अस्तित्वात होती. प्रभु श्रीरामाचा जन्म त्रेतायुगातील आहे. गांधींचा जन्म हा प्रभु श्रीरामाच्या जन्माच्या तुलनेत अलीकडचा आहे. अशा परिस्थितीत ते ‘भारतमातेचे पिता’ कसे ठरू शकतात ? ‘त्यांना भारतमातेचा पिता ठरवणे तर्कशुद्ध आहे’, असे म्हणता येत नाही.

२. गांधींसाठी वापरण्यात येणारी ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी यथार्थ आहे का ? 

देश पारतंत्र्यात होता. तो ब्रिटिशांसारख्या परकीय सत्तेशी लढून आपण स्वतंत्र केला. ‘या स्वातंत्र्यलढ्यात केवळ म. गांधींनीच योगदान दिले’, असे आपल्याला म्हणता येत नाही. त्यासाठी अनेक क्रांतीकारकांनी स्वतःच्या प्राणांची बाजी लावली, स्वतःचे प्राणार्पण केले. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याचे संपूर्ण श्रेय केवळ एकट्या गांधींना देणे, म्हणजे देशातील अन्य देशभक्त जे फासावर चढले, ज्यांनी कारागृहात अनन्वित छळ सहन केला, त्यांच्या त्यागाला दुर्लक्षित करणे, ही कृतघ्नता ठरते. यादृष्टीनेही विचार केल्यावर ‘भारतमातेच्या सर्व वीरपुत्रांनी संघटितपणे ब्रिटीश सत्तेविरुद्ध लढा दिला आणि देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केला’, असेच आपल्याला म्हणावे लागते. म्हणून शाब्दिक अर्थाने किंवा अन्वयार्थानेही गांधींसाठी वापरण्यात येणारी ‘राष्ट्रपिता’ ही उपाधी यथार्थ आहे, असे वाटत नाही.

‘राष्ट्राचा पिता म्हणजे राष्ट्राचा निर्माता’ होय. असा अर्थ आपण जरी धरला, तरीही हे राष्ट्र गांधींनी निर्माण केले, असे आपल्याला म्हणता येत नाही. राष्ट्र आधीपासून अस्तित्वात होते, हे ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. तसेच गांधी हे या राष्ट्राचे पालन पोषणकर्ते होते, असेही म्हणता येत नाही. त्यादृष्टीने त्यांना राष्ट्रपिता म्हणणे सार्थ आहे, असे म्हणता येत नाही.

३. ‘संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य’, या हिंदु महासभेच्या घोषणेवर गांधींना संताप का आला ?

हिंदु महासभेने ‘संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य’, असे घोषित केले. या घोषणेचा संताप इंग्रजांच्या एवढाच गांधींना आला. याच गांधींनी ‘एका वर्षात स्वराज्य मिळवून देतो’, असे हिंदुस्थानच्या जनतेला आश्‍वासन दिले होते. त्या गांधींना हिंदु महासभेने ‘संपूर्ण राजकीय स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य, अशी घोषणा करताच संताप का आला ?’, हा खरा प्रश्‍न आहे.

‘स्वातंत्र्य हा सर्व राष्ट्राचा, व्यक्तीचा नैसर्गिक सिद्ध अधिकार आहे’, असे गांधी म्हणत होते. ‘इंग्रजी सत्ता ही सैतानाची सत्ता आहे’, असेही गांधी म्हणत होते. त्या गांधींना स्वातंत्र्याचा हा ठराव संतापजनक वाटला. गांधींच्या एकंदर जीवनाकडे पाहिले, तर त्यांचे वर्तन हे सुसंगत आढळत नाही. त्यांच्या वर्तनात वारंवार विसंगती आढळते. हे त्यांनीच त्यांच्या ग्रंथात म्हणजेच आत्मचरित्रात म्हटले आहे.

४. गांधींचे धोरण आणि त्यांना बोअर युद्धाच्या वेळी इंग्रजांनी पारितोषिक देणे

आफ्रिकेतील झुलू लोकांनी हिंदुस्थानचे काहीही घोडे मारले नव्हते, तसेच त्यांनी इंग्रजांचेही काही बुडवले नव्हते, हे गांधींना कळत नव्हते. ‘झुलूंच्या स्वातंत्र्याला हिरावून त्याला ब्रिटिशांच्या नखाचा धाक बसवण्यासाठी इंग्रजांनीच खाजवून खरुज काढली’, असे सर्व जगाला कळत होते. इंग्रजांनी झुलूंवर स्वारी केली. इंग्रजांनी झुलूंचे स्वातंत्र्यहरण केले. हे सार्‍या जगाला दिसत होते. तसेच इंग्रज झुलूंना पशूपेक्षाही क्रौर्याने मारत होते.
इंग्रजांनी हिंदुस्थानचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. त्यामुळे इंग्रज हिंदुस्थानचे राजे झाले. हिंदुस्थानची जनता इंग्रज साम्राज्याची प्रजा झाली. ‘प्रजेने साम्राज्याच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे, तो प्रजेचा धर्म आहे’, असे गांधींना वाटले. त्यामुळे गांधींनी झुलूंच्या विरुद्ध इंग्रजी सैन्यात स्वयंसेवा करण्याचे ठरवले. त्या वेळी त्यांना अहिंसा, अन्याय या गोष्टी आठवल्या नाहीत.

आफ्रिकेतील बोअर युद्धाच्या वेळी तसेच घडले. त्या शूर राष्ट्राचे स्वातंत्र्यहरण करण्यास निघालेल्या इंग्रजी सैन्यात गांधी जे स्वातंत्र्य गमावून बसलेले, प्रामाणिक आणि स्वयंसेवक होऊन इंग्रजांच्या सैन्यात शिरले. बोअरांच्या स्वातंत्र्याची हत्या करण्याच्या पवित्र कार्यात ज्यांचे हात लाल झाले होते, त्या इंग्रजांनी पारितोषिके वाटली. गांधींनाही एक पारितोषिक इंग्रजांकडून मिळाले. ते पदक त्यांनी इंग्रजी साम्राज्याचे प्रामाणिक सेवक म्हणून स्वीकारले. हेच गांधींचे सत्याचे प्रयोग होते. गांधींचे हे वर्तन ते राष्ट्रपिता आहेत, हे सिद्ध करते का ?

५. गांधींची हिंदु-मुसलमान यांच्याविषयीची परस्पर विरुद्ध भूमिका !

गांधींनी प्रत्येक वेळी मुसलमानांच्या बाजूने कौल दिला. त्यांचे लांगूलचालन केले. त्यामुळे मुसलमानांचे मनोबल वाढले. केरळमधील मलबारमध्ये मोपलांनी हिंदूंच्या कत्तली केल्या. त्या वेळी गांधींनी मोपलांना दोषी न ठरवता त्यांना शूरवीर ठरवले. अहिंसेचे पूजक असलेले गांधी मुसलमानांना अहिंसेचा धडा शिकवू शकले नाहीत, किंबहुना त्यांनी तसा प्रयत्न केला नाही; मात्र देशभक्त क्रांतीकारकांनी देश स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा मार्ग निवडताच त्यांना हिंसक ठरवले. गांधींची ही परस्पर विरुद्ध भूमिका सर्वसामान्य माणसाच्या आकलनाच्या पलीकडची आहे; कारण त्यांच्या दृष्टीने ‘मुसलमानांनी केलेली हिंसा ही अहिंसा आहे.’ गांधींच्या दृष्टीने हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी हातात शस्त्र घेणे, हा अपराध ठरतो, म्हणजेच गांधी मुसलमान आणि हिंदु यांच्यासाठी वेगळा न्याय देतात.

६. … या वेळी गांधींनी जनतेला दिलेला शब्द पाळला नाही !

‘मी देशाची फाळणी होऊ देणार नाही’, असे गांधींनी घोषित केले होते. तरीही गांधींनी देशाची फाळणी होऊ दिली. त्यामुळे ‘गांधींनी जनतेला दिलेला शब्द पाळला’, असे म्हणता येत नाही. हिंदुस्थानातील मुसलमानांनी मुस्लिम लीगच्या मुखाने देशाची फाळणी मागितली. धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर अत्याचार केले. हिंसक मार्गाने देशाची फाळणी घडवून आणली. या फाळणीच्या वेळी लक्षावधी हिंदूंची कत्तल करण्यात आली. नौखालीतील हिंसाचार आजही अंगावर काटा आणणारा आहे.

७. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘द्विराष्ट्रा’विषयी केलेल्या विधानाची पार्श्‍वभूमी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘या देशात हिंदु आणि मुसलमान ही २ स्वतंत्र राष्ट्रे रहातात’, असे विधान केले होते. सावरकर यांनी असे विधान करण्यापूर्वी अलिगड विद्यापिठाचे संस्थापक सय्यद अहमद यांनीच ‘हिंदुस्थानात हिंदु आणि मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे रहातात’, असे उद्गार वर्ष १८८५ मध्ये काढले होते. त्या वेळी सावरकर यांचे वय ५ वर्षांचे होते. सावरकरांनी केलेले विधान हे ऐतिहासिक पार्श्‍वभूमीवर केलेले विधान आहे. याकडे लक्ष न देता सावरकर यांना ‘द्वीराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडणारा’ म्हणून दोष दिला गेला.

‘व्हाय पाकिस्तान ?’ (Why Pakistan ?) या नावाचा ग्रंथ वर्ष १९४३ मध्ये प्रसिद्ध झाला. या ग्रंथाचे लेखक एस्. रहमान आहेत. पूर्व पाकिस्तान निर्मितीसाठी जे ‘पार्टिशन कौन्सिल’ (फाळणीची परिषद) नेमले गेले, त्याचे ते सभासद होते. त्यांनी या त्यांच्या ग्रंथात स्पष्ट लिहिले…‘‘In India we look up on Muhammad Bin Qasim, Mohammed of Ghori, Babar the great, Emperor Aurangzeb and Tipu Sultan as our national heroes.’’

‘‘The Hindu history and tradition are quite separate from those of the Muslims-His National heroes are Ramachandra, Krishna, Yudhishthir, Bheem, Arjun of the epics and Chandragupta, Ashok, Rana Pratap and Shivaji of the historical era.’’

‘‘In short the Muslims and the Hindus have their own history tradition and national heroes. There sources of inspiration are also quite different and in some cases even opposed to each other. Undoutedly they belong to two separate and distinct nationals.’’

(भावार्थ : हिंदुस्थानात आम्ही महंमद बिन कासिम, घोरीचा महंमद, शहेनशहा औरंगजेब आणि टिपू सुलतान यांना आमचे राष्ट्रपुरुष मानतो. हिंदु इतिहास आणि परंपरा ही मुसलमानांपासून वेगळी आहे. हिंदूंचे राष्ट्रपुरुष आहेत राम, कृष्ण, युधिष्ठिर, भीम, अर्जुन हे पुराणातील आणि चंद्रगुप्त, अशोक, राणा प्रताप, शिवाजी हे इतिहास काळातील ! थोडक्यात हिंदु आणि मुसलमान यांना वेगळा असा त्यांचा इतिहास, परंपरा अन् राष्ट्रपुरुष आहेत. त्यांची स्फूर्तीस्थाने वेगवेगळी आहेत. एवढेच नव्हे, तर ती परस्परविरोधी आहेत. यात संशय नाही की, हिंदु आणि मुसलमान ही दोन वेगळी सुस्पष्ट राष्ट्रे आहेत.) (संदर्भ : ‘फाळणी-युगांतापूर्वीचा काळोख’, लेखक वि. ग. कानिटकर, अस्मिता प्रकाशन, दुसरी आवृत्ती २००६, पृष्ठ ४९३ आणि ४९४)

८. गांधींच्या हिंदु-मुसलमान ऐक्याच्या राष्ट्रघातकी विचारांमुळे देशाची हानी झाली !

गांधींनी ही वस्तूस्थिती स्वीकारण्यास पूर्णपणे नकार दिला. हिंदु-मुसलमान ऐक्य त्यांना देशाचे स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाचे वाटत होते. जी गोष्ट कधीही शक्य नाही, ती गोष्ट मिळवण्यासाठी त्यांनी आग्रह धरला. मुसलमानांच्या या पृथक वृत्तीकडे पूर्णपणे डोळेझाक केली. त्यातूनच भयंकर परिस्थिती निर्माण झाली, ही वस्तूस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. तथापि त्यांच्या या चुकीकडे दुर्लक्ष करून तेच ध्येय साध्य करण्याचा अट्टाहास आजही तसाच चालू आहे. या राष्ट्रघातकी विचारांना कवटाळल्यामुळे राष्ट्राची हानी होत आहे, ही गोष्ट लक्षात घेण्यास आजही देशातील बहुसंख्य नेते, विद्वान आणि पत्रकार सिद्ध नाहीत.

९. व्यक्तीपेक्षा राष्ट्रहिताच्या विचारांना महत्त्व अधिक देणे आवश्यक ! 

गांधींच्या या चुका स्पष्ट केल्या, तरी त्या स्वीकारण्यास देशातील अनेक विद्वान, अनेक नेते आणि पत्रकार पुढे येत नाहीत. ज्यांच्याकडून कळत-नकळत काही चुका घडल्या, ‘त्या चुका आहेत’, हे स्वीकारण्याची बौद्धिक आणि मानसिक सिद्धता अजूनही आपल्या समाजात नाही. परिणामी राष्ट्रहितासाठी योग्य मार्ग निवडण्यामध्ये आपण व्यक्तीला महत्त्व देत आहोत.

एखाद्या व्यक्तीची तत्त्वे, त्याचे राजकीय विचार खरोखरच राष्ट्रहिताचे असतील, तर त्याचा स्वीकार करण्यास आपण पुढे आले पाहिजे. दुर्दैवाने आपल्याला अशा प्रकारचा विचार करून समाज घडवता आला नाही. एखादी व्यक्ती कितीही श्रेष्ठ आणि मोठी असली, तरी सुद्धा त्या व्यक्तीचे विचार राष्ट्रासाठी लाभदायक ठरत असतील, तर त्याचा स्वीकार करायचा असतो. व्यक्तीपेक्षा राष्ट्रहिताच्या विचारांना महत्त्व अधिक असते. ही गोष्टच दुर्लक्षित करून वादंग निर्माण केला जातो, हीच खरी शोकांतिका आहे.

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली, ठाणे. (३.८.२०२३)