पाकने काश्मीर सूत्र उपस्थित करण्याऐवजी त्याला भेडसावणार्‍या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित करावे !

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकला सुनावले !

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकला काश्मीर विषयावरून ठणकावले आहे. काश्मीरचे सूत्र वारंवार उपस्थित करण्याऐवजी पाकने त्याला भेडसावणार्‍या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित करावे, असे भारताने म्हटले आहे.

५ ऑगस्ट या दिवशी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीत पाकने जुना राग आळवत काश्मीरचे सूत्र उपस्थित केले. यावर संयुक्त राष्ट्रांतील भारताचे समुपदेशक आर्. मधुसूदन म्हणाले की, या परिषदेच्या वेळेचा सदुपयोग तेव्हाच होऊ शकतो, जेव्हा इतर देशांचे शिष्टमंडळ माझ्या देशावर आरोप करण्याऐवजी त्यांच्या देशाच्या प्रश्‍नांवर लक्ष केंद्रित करतील. अन्न सुरक्षेच्या तातडीच्या प्रश्‍नावरून लक्ष हटवण्यासाठी एका शिष्टमंडळाने पुन्हा या मंचाचा वापर केला आहे. ते वारंवार त्यांचे धोरण (अजेंडा) पुढे रेटण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

मधुसूदन पुढे म्हणाले, ‘‘जे स्वत:चा सुुप्त हेतू पूर्ण करण्यासाठी आतंकवादाचा अवलंब करतात, अशा लोकांशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि कायम राहील.’’

संपादकीय भूमिका

भारत काश्मीरचे सूत्र आणखी किती दशक मुत्सद्दीपणे हाताळणार आहे ? याऐवजी पाकव्याप्त काश्मीरवर आक्रमण करून ते कह्यात घेतल्यास सर्व प्रश्‍न सुटतील !