‘मणीपूर’वर चर्चा फेटाळली : विरोधकांचे ठिय्या आंदोलन !

विरोधी आमदारांचे सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – मणीपूर येथील हिंसाचाराविषयी विधानसभेत चर्चा करावी, या मागणीवरून ४ ऑगस्ट या दिवशी विरोधी गटातील सदस्यांनी विधानसभेत गदारोळ केला. विरोधी आमदारांनी सभापतींसमोरील हौदात धाव घेतली; मात्र सभापती रमेश तवडकर यांनी हा ठराव फेटाळून लावला. त्यानंतर विरोधी आमदारांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले.

४ ऑगस्ट या दिवशी विरोधक विधानसभेत मणीपूर विषयावरून काळे कपडे परिधान करून आले होते. ‘मणीपूर येथील हिंसाचारावर विधानसभेत चर्चा करण्याविषयी खासगी ठराव विधानसभेच्या कामकाजात का प्रविष्ट करून घेतला नाही ?’, असा प्रश्न उपस्थित करून विरोधी गटातील सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोरील हौदात धाव घेतली. विरोधकांनी मांडलेला ठराव फेटाळतांना सभापती रमेश तवडकर म्हणाले, ‘‘मणीपूरचा विषय हा अत्यंत संवेदनशील आहे. हा विषय सर्वाेच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. राज्य आणि केंद्र शासन यांनी या विषयाची नोंद घेतलेली आहे. यामुळे हा ठराव फेटाळण्यात येत आहे.’’ या वेळी विधानसभेत सर्वच जण बोलू लागल्याने गदारोळ झाला. यानंतर सभापती रमेश तवडकर यांनी जेवणाची सुट्टी घोषित करत कामकाज आटोपते घेतले.

यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेसचे आमदार एल्टन डिकोस्टा, ‘आप’चे आमदार व्हेंझी व्हिएगस आणि आमदार क्रूझ सिल्वा, ‘रिव्होल्युशनरी गोवन्स’चे आमदार वीरेश बोरकर यांनी सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले; मात्र या वेळी ‘गोवा फॉरवर्ड’चे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई आंदोलनास अनुपस्थित राहिले.

प्रसिद्धी मिळवण्यासाठी सभागृहात गोंधळ घालू नका ! – मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आवाहन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सभागृहात मणीपूर येथील हिंसाचाराच्या सूत्रावरून गदारोळ चालू असतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘मणीपूरचा विषय न्यायप्रविष्ट आहे. केंद्रशासनाने मणीपूरच्या हिंसाचाराची नोंद घेऊन त्यावर कृती चालू केली आहे. मणीपूरवासियांना गोमंतकियांचा पाठिंबा आहे. केवळ प्रसिद्धी मिळावी; म्हणून विरोधकांनी मणीपूर येथील हिंसाचाराच्या सूत्रावरून सभागृहात गोंधळ घालू नये.’’